पुन्हा बिबट्याची दहशत; बिबट्या सदृश्य प्राण्याने पाडला श्वानाचा फडशा

पुन्हा बिबट्याची दहशत; बिबट्या सदृश्य प्राण्याने पाडला श्वानाचा फडशा

हराळवाडी/सोलापूर : हराळवाडी (ता. मोहोळ ) येथे मंगळवारी (ता.5) मध्यरात्री हरी धोडमिसे या शेतकर्‍यांच्या शेताजवळील गायरानात बिबट्या सदृश्य प्राण्याने श्वानावर हल्ला करून त्याचा फडशा पाडला आहे.

या भागातील शेतकर्‍यांनी वन विभागाच्या अधिकार्‍यांना बोलावून घेतले. वनविभागाचे अधिकारी सुनील थोरात यांनी परिस्थितीची पाहणी करून ठसे घेतले. ठसे पुढील तपासणीसाठी पाठविले आहेत. प्रथमदर्शनी हे ठसे बिबट्या सदृश या प्राण्याचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. हराळवाडी शिवारात उसाचे क्षेत्र जास्त असल्याने याच परिसरात बिबट्या लपून बसला असेल म्हणून कोणीही शेतकरी शेताकडे जाण्यास तयार नाही. वन विभागाकडे बिबट्याचा वावर असलेल्या भागात पिंजरा लावण्याची मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

जीवाची जोखीम घेऊन शेतामध्ये जाण्याची वेळ येऊ देण्याऐवजी वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर वन विभागाकडून शेतकर्‍यांना आपली सुरक्षा करण्याचे तसेच जनावरांची सुरक्षा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आपली जनावरे गोठ्यामध्ये बांधण्याचे तसेच शेतात जाताना किंवा येताना एकटे न जाता समूहाने जाणे तसेच आवाज करत जाणे किंवा मोबाईलवर गाणे लावून जाणे  तसेच बिबट्या दिसला तर त्याचा फोटो काढण्यासाठी त्याच्या पाठीमागे  जाऊ नये अशा सुरक्षेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

वनरक्षक सुनील थोरात यांनी घटनास्थळी भेट देवून शेतकर्‍यांशी संवाद साधला. पहा व्हिडीओ-

प्रथमदर्शनी हे ठसे बिबट्या सदृश्य प्राण्याचे असून ठसे घेऊन तपासणीसाठी पुढे पाठवून देण्यात आले आहेत. तपासाअंती आपल्याला समजेल  तरी सध्या शेतकर्‍यांनी सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन वनरक्षक सुनील थोरात यांनी केले आहे.