पालकांनो मुलांकडे तुमचे लक्ष आहे का?

पालकांनो मुलांकडे तुमचे लक्ष आहे का?

Ajit Chauhan FB Post 

सोलापूर : पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्यरत असणारे आणि समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने बोलणारे अजित चौहान यांनी शनिवारी फेसबुकवर पालकांना विचार करायला लावणारी पोस्ट केली आहे. 

अजित चौहान यांची पोस्ट - 

अरे मुलांनो दुचाकी चालविण्याचे तुमचं वय नाही.. आज भाऊबीजेची तुमची बहिण घरी वाट पाहतेय..

आज भाऊबीजनिमित्त सगळीकडे दिवाळीची धूम असून सणानिमित्त सहकुटुंब अक्कलकोट दर्शनाला निघालो होतो. पोलीस मुख्यालयासमोरील पेट्रोल पंपावर जवळजवळ 8 ते 10 वयोगटातील 3 मुले दुचाकीवरून जातानाचे दृश्य पाहून धक्काच बसला. शालेय जीवन जगणार्‍या या लहानग्या मुलांच्या हाती दुचाकी वाहन देऊन त्यांच्या अपघातास निमंत्रण कुणी दिले असेल हा यक्ष प्रश्न आहे. जो दुचाकीस्वार होता त्याला गाडी सुद्धा स्टार्ट करता येत नव्हती. फार वेळ तो गाडी स्टार्ट करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होता. तिथे पेट्रोल भरण्यासाठी आलेले अनेकजण या तिन्ही मुलांकडे एकटक नुसते बघत होते परंतु त्यांना हटकण्याचा कुणीही प्रयत्न कुणीही केला नाही हे ही विशेष.

तमाम पालकांना कळकळीची विनंती आहे की, खेळण्या-बागडण्याच्या या वयात आपल्या मुलांच्या अव्यवहार्य मागण्या कृपया पूर्ण करू नका. आपली मुले आपल्या मागे काय करत आहेत याकडे लक्ष द्या आणि त्यांचे जीवन सुरक्षित करा, बस इतकेच....!