महापालिकेला मिळाला स्मार्ट अधिकारी; धनराज पांडे यांची उपायुक्तपदी नियुक्ती

महापालिकेला मिळाला स्मार्ट अधिकारी; धनराज पांडे यांची उपायुक्तपदी नियुक्ती

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून सकारात्मक कामांमुळे चर्चेत असलेले धनराज पांडे यांना सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त करण्यात आले आहे. धनराज पांडे हे स्थानिक निधी वित्त विभागाचे सहाय्यक संचालक  होते. त्यांच्याकडे महापालिकेच्या कोविड नियंत्रण कक्षाचे प्रमुख म्हणून जबाबदारी होती. 

जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांनी सोलापूर शहरातील नागरिकांना कोरोनाच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी कंट्रोल रूमची उभारणी केली. या कंट्रोल रूमचे नियंत्रक तथा समन्वय अधिकारी म्हणून कर्तव्यदक्ष अशा धनराज पांडे यांची नेमणूक करण्यात आली होती. ते स्थानिक निधी लेखा वित्त विभागाचे सहाय्यक संचालक आहेत. परंतु आपल्या वरिष्ठ अधिका-यांनी दिलेली जबाबदारी आपण निष्ठेने पार पाडली पाहिजे, म्हणून या कंट्रोल रूमची वेबसाईट तयार करून सर्व माहिती अपडेट कशी ठेवता येईल, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले.


धनराज पांडे हे मूळचे लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील तोंडार येथील आहेत. धनराज पांडे यांना सोलापूर येथे सेवा बजावत असताना गेल्या महिन्यात कोरोनाची बाधा झाली. त्यांच्याबरोबरच ३ वर्षाच्या मुलाला देखील कोरोना झाला होता. उपचारानंतर दोघेही बरे झाले. 

त्यांच्यानंतर घरातील आई, पत्नी व एक वर्षाच्या मुलीलाही कोरोना झाला. कुटुंबातील तिघे दवाखान्यात असताना तीन वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन सोलापूरकरांच्या सेवेसाठी धनराज पांडे कार्यरत आहेत. कधी मुलाला सोबत घेऊन तर कधी मुलाला आपल्या गाडीच्या ड्रायव्हरकडे थांबवून पांडे सेवा देत आहेत.

सोलापुरातील कोरोना रुग्णांना कशा प्रकारे चांगल्या सुविधा मिळतील यासाठी पांडे यांनी विशेष लक्ष दिल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. आता त्यांच्याकडे सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त पदाची जबाबदारी आल्याने सोलापुरात एका स्मार्ट अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. 

पांडे यांच्या नियुक्तीची बातमी कळाल्यानंतर सोलापुरातील मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे. 

उपायुक्त धनराज पांडे, पोलीस उपाधीक्षक सुरज गुरव आणि त्यांच्या मित्रांचा समूह आहे. हे मित्र ट्रेकिंग तसेच एडवेंचरची आवड जोपासणारे आहेत. नेहमीच सकारात्मक असणाऱ्या उपायुक्त धनराज पांडे यांना स्मार्ट सोलापूरकर परिवाराच्यावतीने शुभेच्छा.