अभिनंदन : उत्कृष्ट तपासाकरिता एसीपी डॉ. प्रीती टिपरे यांना केंद्रीय गृहमंत्री पदक

अभिनंदन : उत्कृष्ट तपासाकरिता एसीपी डॉ. प्रीती टिपरे यांना केंद्रीय गृहमंत्री पदक

सोलापूर : पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलिस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे यांना उत्कृष्ट तपासाकरिता केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर करण्यात आले आहे. सोलापुरातील बाललैंगिक अत्याचार प्रकरणाच्या उत्कृष्ट तपासाची दखल केंद्रीय गृहमंत्रालयाकडून घेण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी उत्कृष्ट तपासाकरिता दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा केली. यात देशातील 152 अधिकाऱ्यांचा तर महाराष्ट्रातील 11 पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सोलापुरात गेल्या दोन वर्षापासून विभाग क्रमांक दोनच्या सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर डॉ. प्रीती टिपरे कार्यरत आहेत. गेल्या वर्षी विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या बाललैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. टिपरे यांच्याकडे होता. दिवस-रात्र एक करून या प्रकरणाचा तपास त्यांनी केला होता.

या गुन्ह्यातील एकूण अकरा संशयित आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. लवकरच या खटल्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे. कालच डॉ. टिपरे वाढदिवस झाला. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या पुरस्काराने वाढदिवसाच्या आनंदात भर पडली आहे.

‘पीडित तरुणीला न्याय मिळावा यासाठी केलेल्या तपासाची दखल केंद्रीय गृहमंत्रालयाकडून घेतल्याने समाधान वाटत आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे तपासाला गती आली’ असे डॉ. टिपरे यांनी सांगितले.