सोलापुरातील अवैध धंद्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

सोलापुरातील अवैध धंद्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

सोलापूर : सोलापूर शहरात सुरू असलेल्या वेगवेगळ्या अवैध धंद्याची चर्चा कायमच सुरू असते. दोन - तीन महिन्याला एखाद्या राजकीय पक्षाकडून अवैधरित्या संदर्भात लक्ष वेधले जाते. अशीच एक तक्रार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

बेकायदेशीर धंद्याच्या आडून फोफावत जाणारी गुन्हेगारी ही सोलापूरच्या दृष्टीने मोठ्या चिंतेची बाब बनली असून या अवैध व्यावसायिकांना पोलिसांचाच वरदहस्त लाभत असल्याची चर्चा होतेय. ज्यामुळे राज्यातील सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. तरी तातडीने आदेश काढून या अवैध व्यवसायांवर कारवाई व्हावी अशा मागणीचे पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले. 

'वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक झाली. त्यावेळी हे निवेदन स्वीकारुन मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली असून मुख्यमंत्री कार्यालयातून तत्काळ पोलिस आयुक्तांना सूचना दिल्याचे समजते. 

शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोलापूर शहर हे विकसनशील शहर म्हणून उदयास येत आहे . आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमांवर वसलेले हे शहर दक्षिण भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. या शहरात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाल्यास येथील युवकांना आर्थिक प्रगती करणे सहज साध्य होणार आहे. या शहराला असलेल्या उद्योगाच्या समृद्ध परंपरेचा वारसा आगामी काळातही कायम टिकणे आणि वाढणे ही सोलापूरच्या सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक बाब आहे.

मात्र सध्या सोलापूरात सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांनी सोलापूर शहराला विळखा घातला आहे. त्यामुळे सोलापूर शहर उद्योग जगताच्या नकाशावर कायमस्वरूपी नकारात्मक स्थितीत दिसण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री महोदय , सध्या सोलापूरात मटका धंदे आणि मटका कंपन्यांचा सुळसुळाट झाला आहे. आयपीएल क्रिकेटवर लागणारा लाखो रुपयांचा सट्टा ही धोकादायक बाब आहे. याशिवाय पत्त्याचे जुगार अड्डे, डान्स बार, हातभट्टी दारू, वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरणे, गुटखा- मावा यांची अवैधरीत्या होणारी विक्री, खासगी अवैध सावकारी धंदा, चेन स्नॅचिंग, घरफोड्यांचे वाढते प्रमाण, अनेक अंमली पदार्थांची विक्री, शहरात बेकायदेशीरपणे होणारी बेसुमार वाळू वाहतूक, रासायनिक ताडीची अवैध विक्री, ओव्हरलोडेड ट्रकची वाहतूक अशा अनेक बेकायदेशीर कृत्यांची भलीमोठी यादी सोलापूर शहरात दिसत आहे. या बेकायदेशीर धंद्यांमुळे सोलापूरात अनेक प्रकारच्या समस्या मोठ्या प्रमाणावर उद़्भवत आहेत. बेकायदेशीर धंद्यांच्या आडून फोफावत जाणारी गुन्हेगारी ही सोलापूरच्या दृष्टीने मोठ्या चिंतेची बाब आहे. सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असल्यामुळे पैशाच्या कारणावरून हाणामारी, दमदाटी, सर्वसामान्यांना धमकावणे अनेकदा गोरगरिबांवर अत्याचार करणे असे प्रकार सर्रास घडताना दिसत आहेत. पोलिसांच्या धाकामुळे अशा घटनांचे प्रमाण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. 

गुंडगिरी, सावकारी अशा प्रकारांमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. यात सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे, ही बाब अधिक चिंतेची आहे. या सर्व प्रकारात धक्कादायक बाब म्हणजे सोलापूर शहरात चालणाऱ्या अवैध धंद्यांना सोलापुरातील पोलिसांचाच पाठिंबा असल्याचे किंबहुना अनेक प्रकारात पोलिसांचाच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असल्याची चर्चा सोलापूर शहरात अनेक ठिकाणी पाहायला मिळते. कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेले पोलिसच जर अवैध धंद्यांना पाठीशी घालत असतील तर सोलापूर शहरासारख्या ठिकाणी शांतता, गुन्हेगारीचे प्रमाण कमी होणे, अवैध धंद्यांवर लगाम लागणे अशा खूप गोष्टी घडणे दुरापास्त होईल.

सोलापुरातील सर्वसामान्य नागरिक हा बहुतांश कामगार वर्गातील आहे. या कामगार वर्गाला मटका, आयपीएलवरील सट्टा, पत्त्याचे जुगार अड्डे, हातभट्टी दारू, गुटखा-माव्याची विक्री, अमली पदार्थांची विक्री, रासायनिक ताडीची विक्री या प्रकाराचा मोठा फटका बसत आहे. सोलापूरात राजरोसपणे चालणारे हे अवैध धंदे सोलापूरचे नाव बदनाम करण्यास कारणीभूत ठरत आहेत. 

मुख्यमंत्री महोदय, आगामी काळात राज्यातील इतर महानगरपालिकांसोबत सोलापूर महानगरपालिकेचीही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वी सोलापूरात पोलिसांच्या पाठिंब्याने किंबहुना पोलिसांच्या सहभागाने अवैध धंदे सुरु असल्याची सर्वत्र होणारी चर्चा धक्कादायक आहे. 

निवडणुकीपूर्वी ठाकरे सरकारची प्रतिमा मलिन करण्याचे हे कारस्थान वाटत आहे. त्यामुळे सोलापूरात सुरु असलेले अवैध धंदे तातडीने आदेश काढून बंद करावेत . मुख्यमंत्री कार्यालयातून आवश्यक ते आदेश संबंधितांना द्यावेत आणि दोषींवर कठोर कारवाई करावी ही नम्र विनंती.

या निवेदनाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिवांतर्फे आयुक्तांना फोनवरुन नाराजी कळवली आणि संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले.