पंढरपुरात 7 ते 13 ऑगस्टदरम्यान पूर्ण संचारबंदी

पंढरपुरात 7 ते 13 ऑगस्टदरम्यान पूर्ण संचारबंदी

सोलापूर : कोरोना विषाणूची साखळी  तोडण्यासाठी  पंढरपूर  आणि शेजारील काही गावांमध्ये 6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट 2020 दरम्यान पूर्ण संचारबंदी (लॉकडाऊन) लागू केली  जाणार आहे, अशी माहिती  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.

            सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केल्या गेलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी आज श्री. शंभरकर यांनी प्रसारमध्यमांशी संवाद साधला. यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव आदी उपस्थित होते.

             जिल्हाधिकारी श्री.शंभरकर यांनी सांगितले की, ‘पंढरपूर शहरातील कोरोना प्रसार रोखण्यासाठी पूर्ण संचारबंदी केली जावी, अशी मागणी होत होती यानुसार 7 ते 13 ऑगस्ट 2020 या कालावधीत संचारबंदी (लॉकडाऊन) लागू करण्यात येत आहे. संचारबंदीच्या कालावधीत पंढरपूर शहरातील मंदीर परिसर, प्रदक्षिणा मार्ग या परिसरात व्यापक प्रमाणावर रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात येणार आहेत. सात दिवसात कोरोना संसर्ग रोखण्यात कितपत यश येते, याचा आढावा घेवून संचारबंदीबाबत पुढील निर्णय घेतला जाईल’. 

            अक्कलकोट, बार्शी येथील कोरोना संसर्गाला आळा घालण्यात प्रशासनाला यश येत आहे. येथील सर्व उपचार पध्दती टास्क फोर्सच्या सूचनेनुसार केली जात आहे. बार्शी, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी  प्रत्येकी 2000 रॅपिड अँटिजेन टेस्टच्या किट उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. जिल्हाभरात 4 लाख 68 हजार कोमॉर्बिड नागरिक असल्याचे सर्व्हेक्षणातुन स्पष्ट झाले आहे. यापैकी संशयित व्यक्तींची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यासाठी चाळीस हजार किट उपलब्ध करण्यात येणार आहेत, अशी माहितीही श्री. शंभरकर यांनी दिली.

             पोलीस अधीक्षक श्री. पाटील यांनी सांगितले की, पंढरपूर येथे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे. पंढरपूर वगळता जिल्ह्यात इतरत्र लग्नसमारंभ, अंत्यविधी आदीसाठी नियमांचे काटेकोर पालन करावे.