सोमवारपासून सुरू होणार कोरोनामुक्त गावातील शाळा

सोमवारपासून सुरू होणार कोरोनामुक्त गावातील शाळा

सोलापूर : शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या 450 गावातील 335 शाळा सोमवारपासून सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिल्या. राज्य शासनाने नुकतेच कोरोनामुक्त झालेल्या गावात 8 ते 12 वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत, या पार्श्वभूमीवर श्री. भरणे यांनी या सूचना दिल्या.

नियोजन भवन येथे कोरोनाविषयक आढावा बैठकीत श्री. भरणे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आदी उपस्थित होते.

श्री. भरणे यांनी सांगितले की, जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे, ही आनंदाची बाब आहे. ज्या ठिकाणी गेल्या एक महिन्यात एकही कोरोनाचा रूग्ण आढळलेला नाही, अशा गावात 8 वी ते 12 वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या शासनाने सूचना दिल्या आहेत. सुरू करण्यात येणाऱ्या शाळांचे सॅनिटायजेशन करून घ्या, शिक्षक, विद्यार्थ्यांच्या कोरोना टेस्ट, शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

दुसऱ्या डोसला प्राधान्य द्या

कोरोनाचे उपचार घेत असलेल्या रूग्णांच्या प्रमाणात लस उपलब्ध करून देण्याच्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे लसीचे नियोजन करा. यापुढे जिल्ह्याला लसीची कमतरता पडणार नाही. ज्यांचे पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवस होतात, त्यांच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्याच्या सूचनाही श्री. भरणे यांनी केल्या.

महापौर श्रीमती यन्नम यांनी शहराला जादा लस देण्याची मागणी केली. यावर श्री. भरणे यांनी सांगितले की, आतापर्यंत शहरात 25 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून हे प्रमाण ग्रामीण भागात 14 टक्के आहे. सध्या लोकसंख्येच्या प्रमाणात शहरात 30 टक्के लस तर ग्रामीण भागात 70 टक्के लसीचा पुरवठा करण्यात येत आहे. लसीकरणामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होऊ लागले आहे.

म्युकरमायकोसिस, लहान बालके, कोमॉर्बिड रूग्णांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचनाही श्री. भरणे यांनी दिल्या.

श्री. स्वामी यांनी सांगितले की, कोरोनामुक्त झालेल्या 40 गावात महसूल, पोलीस आणि कृषी विभागाच्या मदतीने ग्राम समितीच्या बैठका घेतल्या. सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील 75 हजार मुलांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने त्यांना शाळेत न बोलवता घरी, ओट्यावर किंवा झाडाखाली शिक्षण द्यायला चालू केले आहे, याला पालकांकडून प्रोत्साहन मिळत आहे.

सध्या 2397 रूग्ण ग्रामीण भागात तर 94 सोलापूर शहरात असे 2491 कोरोनाचे रूग्ण उपचार घेत आहेत. माझे मूल माझी जबाबदारी अंतर्गत जिल्ह्यातील तीन लाख 76 हजार बालकांची तपासणी करण्यात आली असून 6409 बालकांना चार प्रकारचे आजार असल्याचे आढळून आले. कोविड सदृश 426 बालकांपैकी 56 बालके कोरोना पॉजिटिव्ह असल्याचे आढळल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी सांगितले.

आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे 569 रूग्ण आढळून आले असून 415 रूग्ण बरे झाले आहेत. 76 रूग्ण उपचार घेत असून औषधोपचाराची कोणतीही कमतरता नाही. सर्व रूग्णांना मोफत इंजेक्शन दिली जात असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी दिली.

आयएमए घेणार दोन्ही पालक गमावल्या बालकांच्या आरोग्याची काळजी

जिल्ह्यात कोरोनामुळे आई आणि वडील गमावलेल्या 17 बालकांच्या आरोग्याची काळजी यापुढे आयएमए घेणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मिलिंद शहा यांनी दिली.

धनादेशाचे वाटप

कर्तव्यावर असताना कोरोनामुळे निधन झालेल्या पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक राठोड, अंगणवाडी सेविका कल्पना गुरव (सासुरे, ता. बार्शी) आणि हालीमादी सद्री (सितापूर, ता. अक्कलकोट) यांच्या नातेवाईकांना पालकमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते 50 लाख रूपयांचे धनादेश देण्यात आले.

बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, डॉ वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. शुभलक्ष्मी जयस्वाल, लसीकरण समन्वयक डॉ. अनिरूद्ध पिंपळे यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.