दाते पंचांगानुसार असा असेल यंदाचा पावसाळा!

दाते पंचांगानुसार असा असेल यंदाचा पावसाळा!

Date-Panchang-Monsoon-Prediction-News


सोलापूर : दाते पंचांग नुसार मान्सूनची सुरुवात चांगली दिसते. विशेषतः जुलै, ऑगस्ट मध्ये पाऊस समाधानकारक होईल. परंतु काही ठिकाणी हानिकारक असेल.

पावसाळ्याच्या उत्तरार्धात मात्र पर्जन्यमान कमी राहील. मात्र एकंदरीत सरासरी इतका पाऊस होईल. (हा पर्जन्य विचार लिहिण्याच्या कामी ज्यो. सिद्धेश्वर मारटकर यांचे सहकार्य लाभले आहे.)

नक्षत्र निहाय पर्जन्य विचार -

मृग नक्षत्र - दि. 8 जून 2022 रोजी बुधवारी दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांनी सूर्याचे मृग नक्षत्र सुरु होत आहे. प्रवेश वेळी सिंह लग्न उदित होत असून अग्नि मंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन गाढव असून फक्त शनि अमृत नाडीत आहे. ग्रहांचे योग पाहता वीजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मुंबई येथे पर्जन्यमान चांगले असेल. दि. 8, 9, 16 ते 20 पाऊस अपेक्षित.

आर्द्रा नक्षत्र - दि. 22 जून 2022 रोजी बुधवारी सकाळी ११ वाजून ४२ मिनिटांनी सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करीत आहे. सिंह लग्न उदित असून अग्नि मंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन मेंढा असून फक्त शनि ग्रह अमृत नाडीत आहे. पाऊस समाधानकारक होईल मात्र किनारपट्टीवर पावसामुळे पूर सदृश स्थिती संभवते.दि. 22, 23, 28 ते जुलै 3 पाऊस अपेक्षित.

पुनर्वसु नक्षत्र - दि. 6 जुलै 2022 रोजी सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी सूर्याचे पुनर्वसु नक्षत्र सुरु होत आहे. प्रवेश वेळी सिंह लग्न असून वायु मंडल योग होत आहे. या नक्षत्राचे वाहन उंदीर असून फक्त शनि अमृत नाडीत आहे. या नक्षत्रामध्ये मोठी पर्जन्यवृष्टी संभवते. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा विभागात मोठे पाऊस होतील. काही ठिकाणी पूर येतील. दि. 6, 7, 8, 13 ते 17 पाऊस अपेक्षित.

पुष्य नक्षत्र - दि. 20 जुलै 2022 रोजी बुधवारी सकाळी १० वाजून ४८ मिनिटांनी सूर्य पुष्य नक्षत्रात प्रवेश करतो. त्यावेळी कन्या लग्न असून वायु मंडल योग होत आहे. या नक्षत्रांचे वाहन कोल्हा असून रवि, शनि हे ग्रह जलनाडीत आहेत. 16 जुलैच्या ऋतुउत्तेजक रवि-बुध युतीमुळे पर्जन्यमान चांगले राहील. कोकण, कोल्हापूर, दक्षिण महाराष्ट्रात पाऊस चांगला होईल. दि. 26 ते 31 पाऊस अपेक्षित.

आश्लेषा नक्षत्र - दि. 3 ऑगस्ट 2022 रोजी बुधवारी सकाळी ९ वाजून ३७ मिनिटांनी सूर्याचे आश्लेषा नक्षत्र सुरु होत आहे. प्रवेश वेळी कन्या लग्न असून वायु मंडल योग आहे. या नक्षत्राचे पर्जन्य सूचक मोर हे वाहन आहे.रवि-शनि हे ग्रह जलनाडीत आहेत. या नक्षत्राचा पाऊस सुद्धा चांगला होईल असे ग्रहमान आहे. मात्र या पावसामुळे काही ठिकाणी नुकसान होईल. दि. 3, 4, 10 ते 14 पाऊस अपेक्षित.

मघा नक्षत्र - दि. 17 ऑगस्ट 2022 रोजी बुधवारी सकाळी ७ वाजता २२ मिनिटांनी सूर्य मघा नक्षत्रात प्रवेश करीत आहे. प्रवेश वेळी सिंह लग्न असून अग्नि मंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन घोडा असून रवि, शनि हे ग्रह जलनाडीत आहेत. 14 ऑगस्टच्या रवि शनि प्रतियुतीमुळे या नक्षत्रात अल्प वृष्टीचे योग आहेत. काही भागात पाऊस बऱ्यापैकी होईल. दि. 23 ते 28 पाऊस अपेक्षित.

पूर्वा नक्षत्र - दि. 30 ऑगस्ट 2022 रोजी मंगळवारी उत्तररात्री ३ वाजून १७ मिनिटांनी सूर्याचे पूर्वा नक्षत्र सुरु होत आहे. कर्क लग्न उदित असून वायुमंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन मेंढा असून रवि, शनि हे ग्रह जलनाडीत आहेत. या नक्षत्राचा पाऊस ओढ धरेल व पाऊस कमी पडेल. दि. 6 ते 10 पाऊस अपेक्षित.

उत्तरा नक्षत्र - दि. 13 सप्टेंबर 2022 रोजी मंगळवारी रात्री ९ वाजून १४ मिनिटांनी सूर्य उत्तरा नक्षत्रात प्रवेश करतो. त्यावेळी मेष लग्न असून अग्नि मंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन गाढव असून रवि, शनि हे ग्रह जलनाडीत आहेत. या नक्षत्रात सुद्धा पाऊस ओढ धरेल व अल्पवृष्टि होईल. शेवटच्या चरणात पर्जन्यमान सुधारण्याची शक्यता आहे. दि. 20 ते 24 पाऊस अपेक्षित.

हस्त नक्षत्र - दि. 27 सप्टेंबर 2022 रोजी मंगळवारी दुपारी १२ वाजून ४३ मिनिटांनी सूर्याचे हस्त नक्षत्र सुरु होत आहे. त्यावेळी धनु लग्न असून या नक्षत्राचे वाहन कोल्हा आहे. वरुण मंडल योग असून बुध, शनि हे ग्रह जलनाडीत आहेत. या नक्षत्रात पाऊस हुलकावणी देईल. काही भागात जोरदार पाऊस पडेल. दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा भागात वृष्टि होईल. दि. 4 ते 8 पाऊस अपेक्षित.

चित्रा नक्षत्र - दि. 10 अक्टोबर 2022 रोजी सोमवारी उत्तररात्री १ वाजून ४५ मिनिटांनी सूर्य चित्रा नक्षत्रात प्रवेश करीत आहे. प्रवेश वेळी कर्क लग्न असून अग्नि मंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन उंदीर असून बुध, शनि जलनाडीत आहेत. काही भागात वादळी पावसाचे योग आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान होईल. उत्तर व मध्य महाराष्ट्रात पाऊस होईल. दि. 14 ते 18 पाऊस अपेक्षित.

स्वाती नक्षत्र - दि. 24 अक्टोबर 2022 रोजी सोमवारी दुपारी १२ वाजून १८ मिनिटांनी सूर्य स्वाती नक्षत्रात प्रवेश करीत आहे. प्रवेश वेळी धनु लग्न उदित असून वरुण मंडल योग आहे. या नक्षत्राचे गाढव हे वाहन असून फक्त शनि जलनाडीत आहे. या नक्षत्राचा पाऊस लहरी आहे. काही ठिकाणी पडेल परंतु एकंदरीत अल्पवृष्टीचे योग आहेत. दि. 25, 26, 30, 31 पाऊस अपेक्षित.

माहिती सौजन्य : दाते पंचांग डॉट कॉम