अरे बापरे ! चक्क कारच्या इंजिनमध्ये शिरला धामण!

अरे बापरे ! चक्क कारच्या  इंजिनमध्ये शिरला धामण!

सोलापूर : कारच्या इंजिनमध्ये  धामण साप निघाल्याची घटना समोर आली आहे.

दि. 25 जून 2022 रोजी दुपारी 1 वा.सोलापूर पुणे हायवेवर बाळे येथील नेकसा शोरूमचे वाशिंग सुपरवायझर चेतन स्वामी यांनी WCAS चे सदस्य वैभव पुजारी यांना फोनवर माहिती दिली की, शोरूममध्ये गाडी पार्कींग केलेल्या फोर व्हीलर गाडीच्या इंजिनमध्ये एक भला मोठा साप शिरला आहे. पण वैभव बाहेर गावी असल्याने त्यांनी क्षणाचा विलंब न करता कॉल ट्रान्स्फर करून WCAS चे सुरेश क्षीरसागर यांना माहिती दिली. क्षीरसागर हे काही कामानिमित्त पाकणी मध्ये होते 15 ते 20 मिनिटांत ते शोरूमकडे निघाले. तसेच त्या सापावर लक्ष ठेवायला सांगण्यात आले .

दत्तात्रय पाटील हे बलुनो फोरव्हीलर MH 13 DT 6725 ही गाडी वाशिंगसाठी नेकसा शोरूमला घेऊन आले होते. वाशिंग झाल्यानंतर चेतन स्वामी यांनी गाडी पार्कींगमध्ये लावली. गाडीतून खाली उतरले. समोर अचानकपणे गेटच्या आवारातून एक भला मोठा साप पार्किंग कडे येत असल्याचे त्यांना दिसले. स्वामी तो साप कुठे जातो त्यावर लक्ष ठेऊन होते. व झाले असे की तो साप फोर व्हीलरच्या खाली गेला व गाडीच्या इंजिनमध्ये जाऊन बसला. साप गाडीच्या इंजिनमध्ये गेल्यामुळे शोरूममधले सर्व कर्मचारी घाबरून गेले होते.

Video-

सुरेश क्षीरसागर व प्रवीण गावडे हे दोघेही घटनास्थळी पोहोचल्यानंतर क्षीरसागर यांनी गाडीचा बॉयनेट उघडून इंजिनमध्ये पाहणी केली असता त्यांना धामण बिनविषारी साप साधारण साडेपाच ते सहा फूट लांबीचा साप इंजिनमध्ये एका कोपऱ्यात बसलेला दिसून आला. क्षीरसागर यांनी त्या धामण बिनविषारी सापाला अलगद हाताने सुरक्षित इंजिनमधून बाहेर काढले व एका पिशवीत बंद केले. व त्या धामण सापाबद्दल तेथे जमलेल्या लोकांना अभ्यासपूर्ण माहिती दिली. साप गाडीतून बाहेर काढल्यावर गाडीमालक दत्तात्रय पाटील यांनी सुटकेचा श्वास घेतला. WCAS टीमचे आभार मानले व त्या सापाला पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सुखरूप सोडून दिले.

मराठी नाव: धामण बिनविषारी साप 

इंग्रजी नाव: Common Rat Snake 

शास्त्रीय नाव: Ptyas mucosa 

लांबी :- ७ ते ९ फुटापर्यंत 

वैशिष्ट्ये : संपूर्ण भारतात सर्वत्र आढळणारा हा साप शेतामध्ये तसेच सर्व प्रकारच्या अधिवासात आढळतो . या सापाचे डोळे मोठे असतात . तसेच डोळ्यांखाली काळे उभे पट्टे दिसून येतात . शरीराचा रंग पिवळसर तपकिरी , हिरवट तपकिरी किंवा काळा असतो . शेपटी लांब व निमुळती असते व त्यावर काळ्या रंगाची जाळीदार नक्षी दिसून येते . पोटाकडील रंग पिवळसर पांढरा असतो . हा साप दिनचर असून अत्यंत चपळ असतो . भक्षाच्या शोधात झाडावर सहज चढतो . डिवचला गेला असता मान फुगवून गुरगुरल्यासारखा आवाज काढतो . मोठ्या प्रमाणात उंदीर खातो . त्यासोबतच बेडूक , पाली , सरडे , छोटे पक्षी व वटवाघुळ खाल्ल्याचीही नोंद आहे . क्वचित पक्ष्यांची अंडी व प्रसंगी इतर साप खाऊन जगतो .मादी १५ ते ३० अंडी घालते . पावसाळ्यात सर्वत्र पिल्ले आढळून येतात.