निसर्ग भटकंतीने साजरी केली कोजागिरी!

निसर्ग भटकंतीने साजरी केली कोजागिरी!

देवकुंड धबधबा, तिकोणा किल्ल्यावर भटकंती; इको फ्रेंडली क्लबचा उपक्रम; शिक्षीकांसह विविध क्षेत्रातील महिलांचा सहभाग 

सोलापूर : प्रसिद्ध अशा देवकुंड धबधबा परिसरात आणि तिकोणा किल्ल्यावर भटकंती करुन सोलापुरातील विविध क्षेत्रातील महिलांनी आणि विद्यार्थ्यांनी कोजागिरी पौर्णिमा आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरी केली. इको फ्रेंडली क्लबच्यावतीने 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी देवकुंड धबधबा आणि तिकोणा किल्ला परिसरात निसर्ग भ्रमंतीचे आयोजन करण्यात आले होते.

निसर्ग पर्यटन वाढावे यासाठी कार्यरत असलेल्या इको फ्रेंडली क्लबच्या आजवर हजारो सोलापूरकरांना पर्यटन घडविले आहे. महिलांच्या आग्रहावरुन कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दोन दिवसाच्या निसर्ग भ्रमंतीचे आयोजन करण्यात आले होते. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी देवकुंड धबधबा आणि कुंडलिका नदी परिसरात भटकंती करण्यात आली. उंचावरुन कोसळणार्‍या देवकुंड धबधब्याचा अद्भुत नजारा पाहून सारेच आनंदुन गेले. देवकुंड जवळील पाटणुस या गावात स्थानिक गाईड संकेत यांच्या घरी चहा, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. ताम्हिनी घाटातून सर्व ट्रेकर तिकोना किल्ल्याच्या दिशेने रवाना झाले.

सायंकाळी तिकोणा किल्ला परिसरात कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यासाठी छान नियोजन करण्यात आले होते. गावकरी पुंडलिक मोहोळ यांच्याकडे टेंटमधील मुक्कामाची व्यवस्था होती. जेवणानंतर कोजागिरीच्या अनुषंगाने गाणी आणि गप्पा झाल्या. यावेळी मसाला दुधाची व्यवस्था करण्यात आली होती.

20 ऑक्टोबर रोजी सकाळी लवकर तिकोणा किल्ल्याच्या भटकंतीला सुरुवात झाली. तासाभराचा ट्रेक करुन सर्वजण किल्ल्यावर पोचले. किल्लेदार सुजित मोहोळ यांच्याकडून किल्लाचा इतिहास आणि भूगोल जाणून घेतला. छत्रपती शिवाजी महाराज की जय.., जय भवानी.. जय शिवाजी.., भारत माता की जय.. आदी घोषणा सर्वांनी दिल्या. दुपारच्या जेवणानंतर हडशी तलाव येथे सर्वांनी बोटिंगचा आनंद घेतला.

इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे, सेवासदन प्रशालेच्या शिक्षीका अश्विनी मोरे-वाघमोडे, इको फ्रेंडली क्लबचे समन्वयक अजीत ऊर्फ सटवाजी कोकणे, पुण्याचे समन्वयक महेंद्र राजे यांच्या नेतृत्वाखाली या ट्रेकमध्ये सेवासदन शिशु विभागाच्या मुख्याध्यापिका संगीता आपटे, सेवासदन संस्था वसतिगृह प्रमुख माधुरी तांदळे, प्रगतशील शेतकरी नीता पाटील, सेवासदन प्रशालेच्या शिक्षिका नेहा तुळजापूरकर, सविता लोखंडे,  वृषाली ढोणसळे, सुषमा कुलकर्णी, हिरज येथील जीवन विकास प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुरैय्या शेख, बोरामणी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका अलका साळुंके, तनया अक्कलकोटे, शिवाली कानडे, श्रावणी ढोबळे, सॉफ्टवेअर इंजिनियर विवेक कोळी, माधुरी कोळी, सुष्मिता अगरवाल, सुमन कटकधोंड, वैष्णवी कटकधोंड, समृद्धी बांगर, सुरभी चाफळकर, पायल कदम, गायत्री पवार, अनन्या पुडूर, प्रा. कुंडलकेशा गायकवाड, मुदिता गायकवाड, सेवासदनच्या लिपीक शालन बिराजदार, सेविका रजनी कोळी यांनी सहभाग घेतला होता. यात वयाची साठी ओलांडलेल्या रजनी कोळी, माधुरी तांदळे, नीता पाटील यांचा उत्साही सहभाग होता.