बाप्पा असली कसली वेळ आणलाव?

बाप्पा असली कसली वेळ आणलाव?

युवा लेखक प्रतीक पाटील यांचे

श्रीगणेशाला भावनिक आवाहन

काय बाप्पा निघालाव पण का ! असं कल्टी देताव का,  राहू द्या हो, आलाव कधी अन चाल्लाव कधी...असं असतंय का..? थांबा ओ जाऊ नका...ओ, आजोबा गणपती, काय तुम्ही पण असंच का ! दरवर्षी गल्लीवरून जाता आमच्या.. या वर्षी आलाव पण नाही. या वर्षी तुमचं दर्शन पण लांबनं दिलाव, हे बरोबर नाही बघा... पटलं नाही आपल्याला..ते लेझीम बी खेळू नका म्हणला... साधं गुलाल लावलो नाही अंगाला यावर्षी... असली कसली वेळ आणलाव ?  मगाशी आमच्या घरी आरती केलो तुमची, तुम्हाला विसर्जनाला न्यायला म्हणून हात लावलो...पुन्हा खाली ठेवलो... मम्मी विचारली आमची,असं का रे ? मी म्हणलो, राहू देत थोडया वेळ...जेवण करून जातेत... बाप्पा, तुम्ही लई भारी दिसालताव आज, म्हणून प्रेमाने तुमच्या गालावरून हात फिरवत होतो तेवढ्यात तुमचा पाय ओला दिसला...मी पुसायला लागलो तसं पाय जरा जास्तच ओलं व्हायला लागले...हे काही नाही हो,  ते थोडं डोळ्यात काही तर गेलं होतं माझ्या म्हणून पाणी येत होतं डोळ्यातून...अन ते तुमच्या पायावर पडत होतं...रडू यायलतं ओ मला...! 
     मग काय तर तुम्ही सोडून चाल्लाव... ते घरातलं डेकोरेशन बी कसलं भंगार वाटालंय तिथं तुम्ही नाही म्हणून...ओ देवा लई शांततेत आलावं यावर्षी अन चाल्लाव पण शांततेत...बॉश,संपवा ओ हे लवकर..बस्स झालं आता...अन पुन्हा पुढच्या वर्षी या बघा सांगायलो...तुम्हाला आत्ताच सांगायलो मी तर यावर्षी लई पापं करणार आहे...हा मगं, ते चांगलं वागलं तर तुम्ही बोलावला वर-बिर काय कराव...एक तर दिवस-काळ वाईट आहेत...हे आपल्याला जगायचं आहे बघा...गेलो तर तुम्हाला सलाम कसं ठोकू ओ बॉश ! हा..हा..चालतंय घेतो काळजी...तुम्ही पण सावकाश जावा...आणि सोबत दिलेले ते मोदक पण खावा वाटेत...मम्मी आमची सकसकाळी उठून केली आहे तुमच्यासाठी...उपाशी बसू नका,बघा...खावा ते अन लक्ष राहू द्या आमच्यावर ! मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !

- प्रतीक पाटील, 
युवा लेखक, सोलापूर
+91 77983 87357