अभिनंदन! गायक पंचवाडकर पिता-पुत्रास कलारत्न पुरस्कार

अभिनंदन! गायक पंचवाडकर पिता-पुत्रास कलारत्न पुरस्कार

मुंबई : मुंबईच्या मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या मोठ्या संस्थेतर्फे, सोलापुरातील प्रख्यात जेष्ठ गायक, "क्षितिज" या संगीत संस्थेचे सर्वेसर्वा, व "पहाट गाणी" या लोकप्रिय कार्यक्रमाचे  निर्माते श्री गिरीश पंचवाडकर आणि त्यांचा तबला वादक कलावंत मुलगा- अक्षय पंचवाडकर या दोघां पिता-पुत्रास त्यांच्या संगीत क्षेत्रातील कार्याबद्दल कलाक्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले आहे.

काल 25 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार सोहळा  मुंबईतून On Line संपन्न झाला. गिरीश यांना कलारत्न गौरव पुरस्कार आणि अक्षयला आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडॉल कलारत्न पुरस्कार मिळाला आहे.

सन्मान चिन्ह, गौरव पत्र, मानाचे वस्त्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
एकाच घरातील पिता-पुत्रास एकाच वेळी पुरस्कार देऊन गौरविले, हा एक सुंदर योग आहे. गिरीश पंचवाडकर हे गेल्या 30 वर्षांपासून भारतभर सुगम संगीताचे विविध कार्यक्रम करीत आहेत.मा. प्रतिभाताई पाटील भारताच्या राष्ट्रपती असताना गिरीश यांनी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात त्यांच्या "क्षितिज" च्या कलाकारांची मराठी गाण्यांची मैफल सादर केली होती. सोलापुरात भल्या पहाटे 5 वाजता, सर्वात प्रथम पहाटगाणी कार्यक्रम रसिकांच्या "हाऊसफुल्ल" गर्दीत सादर करण्याचा मान गिरीश पंचवाडकर यांना आहे.

त्यांचा मुलगा अक्षय पंचवाडकर हा उत्तम तबला वादक आहे. पुण्यातील भक्कम पगाराची चांगली नोकरी सोडून भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार व प्रचार करण्यासाठी त्याने "नादसप्तक संगीत अकादमी" सुरू केली आणि  तो अनेकांना तबला वादन शिक्षण देत आहे.एवढ्या लहान वयात भारतीय शास्त्रीय संगीत प्रसार कार्यासाठी अक्षयला मिळालेला हा राज्यस्तरीय पहिलाच पुरस्कार आहे.