सोलापुरातील स्केल लेस नागांची जागतिक पातळीवर नोंद 

सोलापुरातील स्केल लेस नागांची जागतिक पातळीवर नोंद 

सर्पतज्ञ राहुल शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

सोलापूर  : सोलापूर शहरात आढळलेल्या स्केल लेस म्हणजेच विना खवल्याच्या नागाची अमेरिकेतील रेप्टाईल्स अँड अँफिबीयन्स या जर्नलमध्ये नोंद झाली. या संबंधी सोलापूरचे सर्पतज्ञ राहुल शिंदे यांची संशोधन पत्रिका (रिसर्च पेपर) 26 नोव्हेंबर रोजी प्रकाशित झाला आहे. 

सोलापुरात पहिल्यांदा 2012 साली स्केल लेस नाग जाम मिल परिसरात सर्पमित्र औदुंबर गेजगे यांना आढळून आला. दुसर्‍यांदा 2020 साली असाच एक नाग मोदी परिसरातील सोनी नगर येथे सर्पमित्र प्रवीण जेऊरे व सिद्धाराम कोळी यांना आढळून आला. दोन्ही स्केललेस कोब्राच्या शरीरावरील खवले नसल्याने या सापांची संशोधनात्मक नोंद होणे गरजेचे होते. या संबंधी संशोधन सोलापूरचे सर्पतज्ञ राहुल शिंदे व सातार्‍याचे सर्पतज्ञ अमित सय्यद यांनी केले असून याची जागतिक पातळीवर नोंद झाली आहे. अश्या प्रकारच्या सापाची जागतिक पातळीवर नोंद भारतातून पहिल्यांदाच झाली असून ती सोलापुरात झाल्याने सोलापूरच्या सर्प वैभवात अधिक भर पडल्याचे सर्पतज्ञ राहुल शिंदे यांनी सांगितले. 

या संशोधन प्रत्रिकेसाठी सोलापूरचे सर्पमित्र औदुंबर गेजगे, प्रवीण जेऊरे, सिद्धाराम कोळी, निसार नदाफ, कोल्हापूरचे सर्पमित्र देवेंद्र भोसले व इस्लामपूरचे सर्पमित्र युनूस मणेर यांचे मोलाचे योगदान लाभले असे सर्पतज्ञ राहुल शिंदे यांनी सांगितले. सोलापुरातून सापांवर ही पहिलीच संशोधन पत्रिका आहे. गेले 6 वर्षे चाललेल्या संशोधनाचे सार्थक या नोंदीमुळे झाले असून या विषयावर अधिक संशोधन करणार असल्याचे सर्पतज्ञ राहुल शिंदे यांनी सांगितले. ही संशोधन पत्रिका रेप्टाईल्स अँड अँफिबीयन्स या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.