आजीला मी नातू वाटायचो तर सिस्टर्स, मामा, मावशी गावातील मंडळी..!

आजीला मी नातू वाटायचो तर सिस्टर्स, मामा, मावशी गावातील मंडळी..!

आजीने कोरोनोेवर मात केल्यानंतर डॉ. विशाल गोरे यांची भावनिक पोस्ट

सोलापूर : वेळेत घतलेल्या उपचारामुळे आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे अनेक रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत. विशेषतः अनेक ज्येष्ठ मंडळीही कोरोनावर मात करत आहेत. नुकतेच एका 90 वर्षाच्या आजीने कोरोनावर मात केली. आजी बरी होऊन घरी गेल्यानंतर तिच्यावर उपचार करणार्‍या डॉ. विशाल गोरे यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

डॉ. विशाल गोरे यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेली भावना -
'आज  90 वर्षांच्या आजीला या महामारीतून बरं करून घरी पाठवताना खरंच खूप समाधान वाटलं... आज मुद्दाम लिहावं वाटलं... हा आजार शारीरिकच नव्हे तर मानसिक दृष्ट्या फक्त रुग्णालाच नव्हे तर डॉक्टर्सला खचवतो आहे... 

आजी कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे नातेवाईकांना जवळ येण्याची परवानगी नव्हती.. तिकडे त्यांचा मुलगा रोज फोनवर हळहळ व्यक्त करायचा की डॉक्टर आम्ही तिला भेटू शकत नाहीये आणि आजीला हे कळत नव्हतं की हा आजार असा कसा आहे की माझे जवळचे माझ्या आजूबाजूला दिसत नाहीयेत??? या दोन्ही प्रश्नांना हाताळणं आणि त्यातून रुग्णाला बरं करणं म्हणजे कसोटीच... सीएनएस हॉस्पिटलचा स्टाफ आणि मी आजीचे नातेवाईक झालो... आजीला मास्कमध्ये असणारा मी नातू वाटायचो तर सिस्टर्स, मामा, मावशी गावातील मंडळी..

एकीकडे आजी ऑक्सिजन, सलाईन लावून घ्यायला तयार होत नसे आणि तिकडे तिचा वाढता दम, कमी जास्त होणारा बीपी, मानसिक असंतुलन या सगळ्या गोष्टी... खूप मेहनत केल्यावर आजी 2 घास खायची. गोळ्या घ्यायची, माझ्या हातून पाणी पिल्यावर तोंडभरून आशीर्वाद द्यायची. जेंव्हा तिची तब्बेत चढ उतार व्हायची तेंव्हा तिची अवस्था पाहून मन खिन्न व्हायचं... पण मनात एकच जिद्द होती आजीला परत एकदा तिच्या घरी पाठवायचंय...लढा चालुच होता आजीचा आजाराशी, आमचा तिला बरा करण्यासाठी तर तिच्या घरच्यांचा तिला परत डोळे भरून पाहण्यासाठी... शेवटी अथक मेहनतीनंतर आम्ही जिंकलो, आजीचा दम कमी झाला, स्वॅब निगेटिव्ह आला.. ती बरी झाल्याचा फोन केल्यावर नातेवाईकांचा आनंद गगनात मावेना.. ते माझे आभार मानत होते आणि मी पांडुरंगाचे ज्याने मला तिला बरं करण्याचं बळ दिलं आणि आजीची जगण्याची जिद्द तेवत ठेवली...'