पतीचा जाळून खून: पत्नीची जामिनावर मुक्तता

पतीचा जाळून खून: पत्नीची जामिनावर मुक्तता

सोलापूर : संजय मारुती काळे वय वर्ष 47 रा:- शिरोळे ता:-माढा याचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेली त्याची पत्नी अंजना संजय काळे हिस बार्शी येथील सत्र न्यायाधीश श्री आर.एस.पाटील साहेब यांनी जामीन मंजूर केला.

यात हकीकत अशी की, मयत संजय हा त्याची पत्नी,दोन मुले व सून असे एकत्र राहत होते. दि 26/7/ 2020 रोजी संजय हा घरातून गायब झाला म्हणून त्याचा शोधाशोध सुरू केला.11.00 वा. सुमारास फोनद्वारे समजले की, अकलूज रोडवर छोटा हत्ती पलटी झालेला आहे. त्यावर तेथे जाऊन पाहिले असता, संजय हा जळालेल्या अवस्थेत व त्याच्या चेहऱ्यावर हत्याराने वार करून मयत झालेला दिसला, त्यावर कोणीतरी अज्ञात इसमाने संजय याचा खून केला, अशा आशयाची फिर्याद संजय याचा मुलगा आकाश याने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिली होती.

तपासामध्ये मयत संजयची आकाशच्या पत्नीवर वाईट नजर होती. त्यामुळे मयत संजयची पत्नी अंजना,त्याचा मुलगा आकाश व त्याच्या दोन मित्रांसह त्याचा खून करून खोटी फिर्याद दिली,असे पोलीस तपासात निष्पन्न झाले,त्यावरून पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

मयत संजयची पत्नी अंजना हिने बार्शी येथील सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी एडवोकेट मिलिंद थोबडे यांच्यामार्फत अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस ऍडवोकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात घटनेपासून अंजना ही घरीच होती,तसेच तिचे विरुद्ध गुन्ह्यात सहभाग असल्याबाबत कोणताही सकृतदर्शनी पुरावा नसल्याने तिस जामिनावर मुक्त करण्यात यावे असा युक्तिवाद मांडला. तो ग्राह्य धरुन न्यायाधीशांनी रक्कम रुपये 30,000/- जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

 यात आरोपीतर्फे एडवोकेट मिलिंद थोबडे एडवोकेट संतोष कानडे एडवोकेट निखिल पाटील तर सरकारतर्फे एडवोकेट डी डी देशमुख यांनी काम पाहिले.