शस्त्रक्रिया करण्यास परवानगी; वाचा काय म्हणाले आयुर्वेद डॉक्टर्स..

शस्त्रक्रिया करण्यास परवानगी; वाचा काय म्हणाले आयुर्वेद डॉक्टर्स..

निमा स्टुडंट फोरमतर्फे शासन निर्णयाचे स्वागत

सोलापूर : आयुर्वेद शाखेच्या शल्य (जनरल सर्जरी) आणि शालाक्य (इएनटी) पदव्युत्तर अभ्यासक्रमात त्या-त्या विषयांतील विविध शस्त्रक्रियांचा अभ्यास समाविष्टच आहे. सदर विषयातील शस्त्रक्रिया करणे, हा आयुर्वेद पदव्युत्तर शल्यविशारदांचा हक्कच आहे. यावर भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषद (स्नातकोत्तर आयुर्वेद शिक्षा) संशोधन विनियम, 2020, दि. नोव्हेंबर 19, 2020 च्या भारत शासन निर्णयानुसार शिक्कामोर्तब करण्यात आला. भारत शासनाच्या या निर्णयाचे निमा स्टुडन्ट फोरम, सोलापूर जिल्हा शाखेने स्वागत केले आहे.

यात मुख्यत्वे पुढील शस्त्रक्रियांचा समावेश आहे :

1) सामान्य शल्य (जनरल सर्जरी) :
डेब्राईडमेंट, फेसियोटोमी, केरीटेज, पेरेनियल-एक्जीलरी-ब्रेस्ट अबसेस, सेल्युलाईटीस, स्किन ग्राफ्टिंग, इयर लोब रिपेअर, सिस्ट, लाईपोमा, फाईब्रोमा, एक्सीजन/एम्प्युटेशन ऑफ गॅग्रीन, ऑल स्युचरींग, लाईगेशन/रिपेअर ऑफ टेंडन/मसल, फ्रॅक्चर/डीस्लोकेशन मॅनेजमेंट, लॅप्रोटॉमी, लेजर अब्लेशन, एनल डाईलेशन, फिस्चुलोटॉमी, एक्सीजन ऑफ पाइलोनिडल साइनस, सीस्टोलिथोटॉमी, युरेथ्रल डाईलेशन, फिमॉसीस मॅनेजमेंट, हर्निया/ट्राउमा मॅनेजमेंट, वेरीकोज व्हेन मॅनेजमेंट, प्रोक्टोस्कोपी, कोलोस्टॉमी, अपेंडीसेक्टोमी, ऑर्चीडेक्टॉमी आणि संबंधित सर्व शस्त्रक्रिया.

2) शालाक्यतंत्र (इएनटी) :

नेत्र : स्लींग सर्जरी, एक्ट्रोपीयन/एनट्रोपीयन करेक्शन, चलाझीयन इन्सीजन/करेटेज, बीनाइन लिड ट्युमर एक्सीजन, टेरीजीयम मॅनेजमेंट, आइरीस प्रोलॅप्स मॅनेजमेंट, ग्लुकोमा मॅनेजमेंट, आय ट्राऊमा मॅनेजमेंट, स्क्वींट सर्जरी, डीसीटी/डीसीआर, कॅटेरॅक्ट मॅनेजमेंट, आय एनेस्थेशिया, इ.

- नासा : डेवीएटेड नॅसल सेप्टम सर्जरी, पॉलीप/साईनस मॅनेजमेंट, रिनोप्लास्टी, इ. 
- कर्ण : लोब्युलोप्लास्टी, माइरिंगोटॉमी, मॅस्टॉईडेक्टॉमी, इ.
- मुख : टॉंसीलार अबसेस इन्सीजन/ड्रेनेज, टॉंसीलेक्टॉमी, हेअर लीप रिपेअर, इ.
- दंत : लूज टूथ एक्स्ट्रॅक्शन, रूट कॅनल ट्रीटमेंट, इ.

        पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात या शस्त्रक्रियांचा अभ्यास समाविष्ट असल्याने आयुर्वेद शल्यविशारद या शस्त्रक्रिया स्वतंत्रपणेही उत्तमरित्या करू शकतात. भारत शासनाचा हा निर्णय अगदी योग्य असून स्वागतार्ह आहे, मा. पंतप्रधानांनी आयुर्वेद शाखेच्या हितार्थ निर्णय घेतल्याबद्दल आभारी असल्याची प्रतिक्रिया संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नोंदविली आहे.

डॉक्टरांच्या प्रतिक्रिया :

भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषद, दिल्ली यांच्या तर्फे नुकतेच एक गॅझेट नोटिफिकेशन प्रसिद्ध झाले असून त्या द्वारा आयुर्वेदातील शल्य आणि शालाक्य अर्थात सर्जरी आणि इ. एन. टी. मधील पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर्सना विविध ऑपरेशन्स करण्याची परवानगी असल्याचे नमूद केले आहे. आयुर्वेद हे एक परिपूर्ण शास्त्र असून आधुनिक चिकित्सा पद्धतीने सुद्धा प्राची काळी होणाऱ्या शस्त्रक्रियांची नोंद घेतली आहे. निमा संघटना स्थापने पासूनच इंटिग्रेशनचा पुरस्कार करीत आली असून या नोटिफिकेशन मधील मागणी आणि त्याचा युद्ध पातळीवर पाठपुरावा निमाने सतत केला आहे. आज त्याची पूर्तता झाली असून याबद्दल भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषद आणि केंद्र सरकारचे निमातर्फे आभार.
- डॉ. विनायक टेंभुर्णीकर (आयुर्वेदाचार्य)

राष्ट्रीय अध्यक्ष, निमा


आयुर्वेद शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात पूर्वीपासूनच विविध शस्त्रक्रियांचा अभ्यास आहे. भारत शासनाने हा जो निर्णय घेतला, तो आयुर्वेद सर्जन डॉक्टरांचा हक्कच आहे. मी या निर्णयाचे स्वागत करतो.
- डॉ. सचिन पांढरे (एम. एस. शल्य)

एम. सी. आय. एम. मेंबर,
निर्मल हॉस्पिटल, सोलापूर

शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करतो. प्रसूती तंत्र आणि स्त्रीरोग विषयातील आयुर्वेद पदव्युत्तर सर्जन डॉक्टरांविषयी देखिल असाच निर्णय घेण्यात यावा, यासाठी पाठपुरावा चालू ठेवणार आहे.
- डॉ. तात्यासाहेब देशमुख (एम. डी. आयु.)

सदस्य, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, भारत

शल्यकर्म करत असलेल्या आयुष चिकित्सकांच्या प्रगतीच्या दिशेने हे पुन्हा एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. प्रशिक्षण घेऊन आणि कठोर परिश्रमाने ज्या आयुर्वेद प्रॅक्टिशनर्सनी शस्त्रक्रिया कौशल्य प्राप्त केले, त्यांना चुकीच्या आणि द्वेषयुक्त कायदेशीर कारवाईस विनाकारण सामोरे जावे लागत होते. हे टाळण्यासाठी योग्य कायदेशीर चौकटीची नितांत आवश्यकता होती, जी या अधिसूचनेने पूर्ण केली आहे. हे यश मिळविण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्या सर्वांचे मी अभिनंदन करते. मला खात्री आहे की आमचे सर्व सहकारी या प्रयत्नांचे चीज करतील.
- डॉ. कानिटकर पल्लवी मोरेश्वर (एम. एस. शल्य)

प्राध्यापक, साई आयुर्वेद कॉलेज, वैराग

आज आयुर्वेद शास्त्र शिकलेल्या माझ्या सर्व बांधवांना अभिमान वाटावा, असा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. कित्येक वर्षांपासून सर्वांत जुना, पारंपारिक व काळाच्या ओघात कसोटीवर खरा उतरलेला शास्त्र असूनही आजतागायत या शास्त्राला दुय्यम दर्जाची वागणूक मिळत होती व खास राजाश्रय देखील नव्हता. परंतु आयुर्वेदशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांना सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया यापुढे कायदेशीररित्या व छातीठोकपणे करता येणार आहेत, याचे खरे श्रेय आजच्या केंद्र शासनाला द्यावेच लागेल. शल्यचिकित्सेचा आद्य प्रणेता व जनक म्हणून आजही संपूर्ण जगात आचार्य सुश्रुत यांचे नाव आदराने घेतले जाते; पण आजच्या या निर्णयाने ते देखील सुखावले असणार असे वाटते.
- डॉ. सुरेश धायगुंडे (एम. एस. शालाक्य)

सरकारच्या या निर्णयाचे सहाजिकच स्वागत करतो. या निर्णयामुळे आयुष डॉक्टरांना प्रोत्साहन मिळेल. आज खेडोपाडी आयुष डॉक्टरच काम करतात. त्यामुळे लोकांची खूप चांगली सोय होईल. आरोग्य यंत्रणा सक्षम असणे किती महत्त्वाचे आहे हे कोवीडने दाखवूनच दिले. आयुष डॉक्टरांना त्यांचा हक्क शासकीयरित्या बहाल करण्यात आला, ही आनंदाचीच बाब आहे. आम्हा विद्यार्थ्यांना याचा भविष्यात नक्कीच उपयोग होईल. सरकारचे आभार. 
- डॉ. योगेश उडगीकर (एम. डी. आयु. स्कॉलर)
सहसचिव, निमा स्टुडंट फोरम, महाराष्ट्र राज्य