शिवरायांच्या जन्मभूमीला भेट, जीवधनवर केले ट्रेकिंग!

शिवरायांच्या जन्मभूमीला भेट, जीवधनवर केले ट्रेकिंग!

नव्या वर्षाचे स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने करावे असे प्रत्येकालाच वाटत असते.. तशी संधी आम्हाला इको फ्रेंडली कल्बच्या माध्यमातून चालून आली. या सुवर्णसंधीचा फायदा घेत आम्ही 30 डिसेंबर 2018 च्या रात्री 10 वाजता जुन्नरच्या दिशेने मार्गस्थ झालो. 31 डिसेंबर रोजी सकाळी 8.30च्या दरम्यान सुचिर्भूत होऊन आम्ही अष्टविनायकांपैकी एक ओझरच्या विघ्नेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर आम्ही दुपारी 12 वाजता लेण्याद्रीच्या गिरिजात्मकाचे दर्शन घेतले. संपूर्ण भारतातील शैलगुहांमध्ये जुन्नर येथील गुंफासमूह सर्वात मोठा आहे. मंदिरात प्रवेशासाठी दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. सर्व मंडळी एका चैत्यागृहात गत वर्षातील घडामोडी स्मरत शांत ध्यानस्थ बसलेली होती.

No photo description available.


पुणे जिल्ह्यातील नाणेघाट डोंगररांगेतील 3500 फूट उंचीचा शिवनेरी किल्ला. शकराजा नहपानाची राजधानी जुन्नर या व्यापारीपेठेच्या मार्गावर नजर ठेवण्यासाठी या दुर्गाची निर्मिती करण्यात आलेली. साधारण दुपारी 3 वाजता आम्ही शिवनेरी किल्ल्याची चढाई सुरु केली. गड तसा फारसा मोठा नाही. शिवाई देवीच्या मंदिराकडे जाताना चाफ्याच्या झाडाखाली शुभ्र फुलांच्या सडा पडलेला दिसला. ताजा देठांची दोन शुभ्र फुले हलकेच घेऊन नाकाजवळ नेली. त्यांचा सुवास थेट मनाला भिडला. हा परिमल घेऊन गडावर पुढे चढू लागलो. पानगळीचा ऋतू असल्याने निष्पर्ण चाफ्याची झाडे जागोजागी सोबत होती. सर्व प्रथम शिवाई देवीचे दर्शन घेतले. तेथून पुढे येताच छोटी बाग आहे. पुढे जाताच अंबरखाना दिसला. नंतर अनेक दरवाजे पार करत आम्ही पोचलो रेखीव कमानी, झरोके, सज्जा असलेल्या दुमजली दगडी इमारतीजवळ. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळलेला, तमाम जनतेचे दैवत असणारा जाणता राजा ज्या ठिकाणी जिजाऊच्या कुशीत जन्मला ती ही पवित्रभूमी. महाराष्ट्राच्या मातीत शिवरायांविषयी रुजलेला आदर, निष्ठा आणि अपर प्रेम दर्शविणाऱ्या अशा वास्तूच्या दर्शनाने उर भरून येतो. इथे माथा टेकण्याच भाग्य आम्हाला लाभलं. साधू नयनांनी या जागेवर नतमस्तक झालो. अंत:करण आणि परिसरातील वातावरण शिवरायांच्या स्मृतीने भारावून गेलं होतं. साऱ्या जन्माच सार्थक झाल्याचं एक क्षणभर वाटून गेले. सरत्या वर्षातील एक अविस्मरणीय आठवण मनःपटलावर कोरली गेली. या इमारतीसमोर पाण्याचे टाके आहे. येथून पुढे जाणारा रस्ता आपल्याला कडेलोट टोकाकडे घेऊन जातो. गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी सुमारे 1500फूट उंचीचा हा सरळसोट कडा प्रत्येक ठिकाणी गडावर त्या स्थानाचे नावाचे फलक माहिती व सूचनांचे फलक लावलेले आहेत. कडेलोट टोकावरून येताना मशिदीची कमान पाहिली ती जातानाही दिसलीच होती. सूर्य मावळतीकडे झुकला होता. पश्‍चिम क्षितिजावर टेकलेल्या शेंदरी सूर्य बिंबाने आकाशात रंगाची उधळण केली होती. केशरी रंगाच्या अनेक छटांनी आसमंत नटला होता. 31 डिसेंबर 2018 ची सांज खूपच सुंदर होती. सांजरंगात न्हाऊन वर्षाचा शेवटचा सुर्यास्त शिवनेरीवर पाहत होतो.

आम्ही गडउतार होऊन संध्याकाळी जुन्नर परिसरातील वन विभागाच्या सभागृहात आलो. गेली 9 वर्ष वेद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असणारे माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्राचे डॉ. अजय देशमुख यांची भेट घेतली. डॉ. देशमुख यांच्याकडून अतिशय मोलाची माहिती मिळाली. बिबट्या विषयीचे अनेक गैरसमज दूर करून जनजागृतीचे महान कार्य ते करीत आहेत. तेथून आम्ही वायुदलातील निवृत्त माजी सैनिक सुरेश भोर यांच्या साईसमता मंगल कार्यालयात पोचलो. तिथे मुक्कामची व भोजनाची उत्तम सोय केली होती. माजी सैनिक व सध्या वनविभागात कार्यरत असणारे रमेश खरमाळे यांचे प्रेरणादायी अनुभव ऐकले. जुन्नर विधानसभेचे आमदार शरद सोनावणे यांच्या हस्ते इको फ्रेंडली क्‍लबतर्फे सन्मानपत्र देऊन श्री. खरमाळे यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी आमदारांनी उपस्थितांशी छान संवाद साधला. जुन्नर परिसरातील पर्यटनस्थळांची माहिती त्यांनी दिली. जेवणानंतर शेकोटीचा आनंद घेत प्रत्येकाने नववर्षाचे संकल्प शेअर केले. रात्री 12 च्या ठोक्‍याला सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले आणि 2019 सालामध्ये एकमेकांना शुभेच्छा देत प्रवेश केला.

1 जानेवारी 2019 च्या उत्साहवर्धक सकाळी जीवधन गडावर जाण्यासाठी सारे सज्ज झाले. लांबूनच 2000 फुटाचा वानरलिंगी सुळका (खडा पारसी) लक्ष वेधून घेतो. समोरच नानाचा अंगठा, हरिश्‍चंद्र गड, हडसर, चांवड गड दिसतात. अवघड जंगलातून सुरु होणारी वाट पार करत गडाच्या चढाईला सुरुवात केली. 3754 उंचीचा जीवधन हा गिरिदुर्ग नाणेघाटाच्या हाकेच्या अंतरावर आहे. डावीकडे जाणाऱ्या वाटेने पुढे गेल्यावर कातळभिंत लागते. जीवमुठीत धरून या भिंती पार केल्यावर कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. 1818 मध्ये सूडबुद्धीने इंग्रजांनी सुरंग लावून इथल्या पायऱ्या उध्वस्त केल्या आहेत. त्याच्या खुणा अजूनही दिसतात, त्यामुळे ही वाट अतिशय अवघड बनली आहे. वानरासारखे सरपटत, उड्या मारत तर काही ठिकाणी दोराच्या सहाय्याने रॅप्लिंग करत आम्ही पुढे गेलो. पश्‍चिम दरवाजाने वर पोचल्यावर समोरच गजलक्ष्मीचे शिल्प आहे. तर दक्षिणेस जिवाई देवीचे भग्नावस्थेतील मंदिर आहे. सोबत स्थानिक माहितगार, निसर्गरम्य जुन्नर तालुका परिवाराचे सदस्य विनायक साळुंखे आणि त्यांची टीम होती. धान्याचे कोठार, पाण्याचे टाके, खोदीव पाट पाहण्यासारखे आहे. सोबत आणलेले जेवण केले. आणि गडावरील टाक्‍याचे मधुर पाणी पिऊन आम्ही ताजेतवाने झालो. नवा आत्मविश्वास, नवे चैतन्य आणि नवीन वर्षाची नवी मनोरथे घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

आपण पुस्तकं तर वाचतोच पण गड किल्ल्यांसोबत निसर्ग वाचण्यासाठी इको फ्रेंडली क्‍लबचे संस्थापक परशुराम कोकणे, शैक्षणिक समन्वयक संजीवकुमार कलशेट्टी यांच्या प्रयत्नामुळे जवळपास 70 ट्रेकर्स नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी या उपक्रमात सहभागी झाले होते.

प्रेषिता चपळगांवकर,
बॅंक अधिकारी, सोलापूर