सुशांतसिंहच्या आत्महत्येमध्ये कंगणाचा हात? मुंबई पोलिसांत सोलापूरच्या तरुणाची तक्रार

सुशांतसिंहच्या आत्महत्येमध्ये कंगणाचा हात? मुंबई पोलिसांत सोलापूरच्या तरुणाची तक्रार

सोलापूर : अभिनेता सुशांतसिंह याच्या मृत्यूपूर्वी, त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या लोकांची व कटकारस्थानाची माहिती जाणीवपूर्वक पोलिसांपासून लपवून ठेवून सुशांतसिंह याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या व मुंबई पोलिसांविषयी सातत्याने अप्रीतिची भावना चेतावुन, पोलिसांना बदनाम करणार्‍या बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिचेविरुध्द भा.दं.वी.चे कलम 306, 308, 177, 182, 201, 211, 120 (ब) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (क) सह पोलिसांविषयी अप्रितीची भावना चेतावणे अधिनियम 1922 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करणेसाठी राष्ट्रीय छावाचे योगेश पवार यांनी ऑनलाइन व्दारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, गृह सचिव, मुंबई पोलीस आयुक्त आणि मुंबई पोलीस यांचेकडे तक्रार दाखल केली.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की., सुशांतसिंह राजपूत याने रविवारी 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल असून सुशांतसिंह राजपूत आत्महत्येचा तपास वांद्रे पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचकडून चालू आहे. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत अभिनेत्री कंगना राणावत हिने आक्षेप नोंदवला आहे. अभिनेत्री कंगना राणावतने बॉलिवूडवर अनेक गंभीर आरोप केले असून स्वबळावर नाव कमावणाऱ्या कलाकारांना यशापासून दूर ठेवण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये षडयंत्र रचलं जातं, इंडस्ट्रीतल्या कंपूशाहीने (नेपोटिझम) सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडलं, असा घणाघात कंगनाने केला आहे. एका मुलाखतीत कंगनाने सुशांतचा मृत्यू प्लान्ड मर्डर असल्याचा दावा केला. केवळ इतकेच नाही तर बॉलिवूडमधील नेपोटिजमवर बोलताना अनेक सेलिब्रिटींवर निशाणाही साधला. तसेच कंगना राणावत तिच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून सुशांत आत्महत्या प्रकरणी आणि बॉलिवूडसंदर्भात रोज नवे-नवे खुलासे करीत आहे. त्यामुळे कंगना राणावत हिचे सर्व ट्विट व मुलाखती बघितल्या तर सुशांतसिंह याच्या प्लान्ड मर्डरची व कटकारस्थानाची कंगना राणावत हिला संपूर्ण माहिती होती, हे स्पष्ट होते. असे असतानाही सुशांतसिंह याच्या आत्महत्येपूर्वी, सुशांतसिंह याच्या प्लान्ड मर्डरची व कटकारस्थानाची कंगना राणावत हिने सीआरपीसीचे कलम 39 व 2 (ड) नुसार, कोणतीही माहिती, तक्रार किंवा खबर पोलिसांना दिली नाही. त्यामुळे सुशांतसिंह याच्या आत्महत्येस कंगना राणावत ही सुध्दा तितकीच जबाबदार आहे. तसेच सुशांतसिंह यांच्या आत्महत्येनंतर, कंगना राणावत ही जाणीवपूर्वक मुंबई पोलिसांविषयी जनतेच्या मनात सातत्याने अप्रीतिची भावना चेतावीत असून, मुंबई पोलिसांना बदनाम करीत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच कंगनाने सोशल मीडियावर सुशांतसिंहच्या आत्महत्येचा सहारा घेवून, तिचे वैयक्तिक वाद असलेले विविध अभिनेते व नेत्यांच्या नावाने वादग्रस्त विधाने करीत आहे. तसेच सुशांतसिंह यांची आत्महत्या ही प्लान्ड मर्डर असून याचा कट अनेक वर्षापासून बॉलीवूडमध्ये शिजत असल्याचे सांगत आहे. या प्रकरणावरून मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शंका घेवून जनतेच्या मनात मुंबई पोलिसांविषयी जाणीवपूर्वक अप्रीतिची व व्देषाची भावना उत्पन्न करीत आहे. तसेच कंगनाचे सर्व ट्विट बघितल्यास ती जाणीवपूर्वक काही अभिनेते, नेते व मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी कंगनाने सोशल मीडियावर एक पेड मोहिम सुरु केल्याचे दिसत आहे. तसेच सुशांतसिंह याच्या आत्महत्येमध्ये कंगना राणावत हिचाही हात असण्याची दाट शक्यता असून तिच्या सहभागाविषयी कोणाला संशय येवू नये, म्हणूनच कंगना राणावत ही सातत्याने सुशांतसिंहच्या आत्महत्येविषयी वादग्रस्त खुलासे व विधाने करून पब्लिकसिटी स्टंट करीत असल्याचे योगेश पवार यांनी नमूद केले आहे.

तसेच कंगना राणावत हिने सुशांतसिंह यांच्या प्लान्ड मर्डरची व कटकारस्थानाची कोणतीही ठोस माहिती व पुरावे मुंबई पोलिसांना दिलेले नाहीत. तसेच कंगनाला सुशांतसिंहच्या प्लान्ड मर्डरची माहिती असतांनाही तिने सदरच्या कटाची माहिती पोलिसांना न दिल्यामुळे सुशांतसिंहचा जीव पोलिसांना वाचविता आला नाही. त्यामुळे सुशांतसिंहच्या आत्महत्येस कंगना राणावत ही सुध्दा तितकीच जबाबदार आहे. तसेच कंगना राणावत आणि कॉन्ट्रोव्हर्सी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कंगना अनेकदा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येत असते. दरम्यान आता कंगना राणावत ही तिच्या मनालीतील घराबाहेर गोळीबार झाल्याचे सांगत असून सदरचा गोळीबार आपल्याला घाबरवण्यासाठी केल्याचा दावा कंगना करीत आहे. परंतु, कंगनाच्या घराच्या आसपास अशा कोणत्याही प्रकारचे गोळीबाराचे पुरावे सापडलेले नाहीत, असे हिमाचल पोलिसांचे म्हणणं आहे. तसेच फॉरेन्सिक टीमलाही आसपास कुठेही काडतुस किंवा तत्सम वस्तू आढळलेल्या नाहीत. सध्या हिमाचल पोलीस तिच्या घराशेजारी राहणाऱ्यांकडे कसून चौकशी करीत असून कंगनाच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. यावरून कंगना राणावत ही पब्लिकसिटीसाठी कोणत्याही स्तराला जाते हे, सिध्द होत आहे.

तसेच कंगनाने एका ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, 'जर मुव्ही माफिया एखाद्या मुलीचे प्रेमसंबंध असल्याच्या प्रकरणात फौजदारी खटला दाखल करू शकतात, जर ते त्यांच्या राजकीय नेपोटिझमसोबत माफिया गुंडाबरोबर मध्यरात्री तिच्या घराबाहेर गोळीबार करू शकतात तर मग ते बिहारच्या राजपूत मुलाबरोबर काय करू शकतात याची कल्पना आपण करू शकतो'. कंगनाच्या घराबाहेर गोळीबार झाल्यामुळे घाबरून तिचे कुटुंबीय सुशांतच्या मृत्यूबाबत कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचा दबाव आणत असल्याचा दावा देखील कंगना करीत आहे. यावरून कंगना राणावत हिचा पब्लिसिटी स्टंट दिसून येतो, तसेच तिच्या हेतुविषयीही शंका येतेय. यासर्व घटना आणि कंगनाचे वक्तव्य बघितल्यास सुशांतच्या मृत्यूप्रकरणी कुठे ना कुठे कंगना राणावत हिचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असण्याची दाट शक्यता असल्याचा संशय व्यक्त करीत छावाचे योगेश पवार यांनी कंगना राणावत हिचेविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारीत केली आहे.