लतादीदींनी पहिले गाणे सोलापुरात गायले होते!

Lata Mangeshkar Solapur News

लतादीदींनी पहिले गाणे सोलापुरात गायले होते!

लतादीदींनी पहिले गाणे सोलापुरात गायले होते!

स्मार्ट सोलापूरकर विशेष 

सोलापूर : गानसम्राज्ञी लता मंगेशकर  Lata Mangeshkar यांनी आपल्या आयुष्यातील पहिले गाणे 84 वर्षांपूर्वी सोलापुरात गायले होते. सोलापुरातील कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी टिपलेले छायाचित्र लतादीदींनी गेल्या वर्षी आपल्या अधिकृत फेसबुक हँडलवर आठवणीसह शेअर केले होते.

लतादीदींनी आपल्या फेसबुक पेजवर 29 मार्च 20121 रोजी पोस्ट केली होती. पोस्टमध्ये लतादीदी म्हणाल्या होत्या, ‘आज माझ्या परिचयाचे उपेंद्र चिंचोरे यांचा फोन आला. माझ्या आयुष्यातील पहिले क्लासिकल सादरीकरण माझ्या वडिलांसोबत 9 सप्टेंबर 1938 रोजी सोलापुरात केल्याची आठवण त्यांनी करून दिली. त्या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी सोबतचे छायाचित्र दिले होते. विश्वास बसत नाही‌ गाता गाता 83 वर्ष झाली. माझ्या गाण्याची सुरुवात मी नऊ ते दहा वर्षांची असताना सोलापुरात झाली.’

लतादीदींनी सोलापुरातील पार्क मैदानावर 16 फेब्रुवारी 1994 रोजी झालेल्या सत्कार समारंभात आठवण सांगितली होती. उपस्थित हजारो रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाट करून उत्स्फूर्त दाद दिली होती. त्या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते-पाटील आणि तत्कालीन महापौर मनोहर सपाटे उपस्थित होते. सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला होता. ही आठवण ज्येष्ठ पत्रकार अविनाश व्य. कुलकर्णी सांगितली आहे.

लतादीदींच्या 1938 मध्ये सोलापुरात झालेल्या कार्यक्रमाचे वर्णन करताना मुळचे सोलापूरचे प्रख्यात बासरीवादक स्व. अरविंद गजेंद्रगडकर यांनी 28 सप्टेंबर 2003 रोजी रविवार केसरीच्या पुरवणीत लिहिताना म्हटले होते, ‘सोलापूरच्या एका बंगल्याच्या मोकळ्या मैदानात कनाती बंधूंनी तात्पुरते थिएटर उभारले होते. तिथेच एका रात्री मास्टर दीनानाथ यांची नाट्यसंगीताची मैफल रंगली होती. गाण्यांची साथ लता मंगेशकर यांनी केली होती. या कार्यक्रमाचे तिकीट होते फक्त आठ आणे. या कार्यक्रमासाठी माझ्या वडिलांसोबत गेलो होतो. थिएटर भरले होते. पडदा उघडला मास्टर दीनानाथ यांच्यामागे तेजस्वी डोळ्याची लता तंबोरा घेऊन बसली होती. दोन्ही खांद्यावर भरगच्च लांब केसांच्या दोन वेण्या जमिनीपर्यंत आल्या होत्या. परकर पोलके घातलेल्या त्या मुलीच्या चेहऱ्यावरून आत्मविश्वास ओसंडून वाहत होता. मास्टर दीनानाथ यांचा आवाज लागत नव्हता. ते थकलेले दिसत होते. त्यांनी लतादीदींना पुढे यायची खुण केली आणि म्हणाले आता हीचे गाणे सुरू होईल. लता सरसावून बसली. तिने पहिला सुर असा लावला की सगळे मरगळलेले सभागृह सोनेरी चैतन्याने चमकू लागले. वाहवा.. बहुत खूबची बरसात होऊ लागली.’