मुख्यमंत्र्यांना सांगितल्या कोरोना नियंत्रणाच्या अडचणी; आमदार प्रणिती शिंदेंनी पंढरपुरात घेतली भेट

मुख्यमंत्र्यांना सांगितल्या कोरोना नियंत्रणाच्या अडचणी; आमदार प्रणिती शिंदेंनी पंढरपुरात घेतली भेट

सोलापूर : सोलापूरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोव्हिड 19 रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच या रोगामुळे रुग्णांचा मृत्युही मोठ्या प्रमाणात होत आहे. कोव्हिड 19 रुग्णांचे उपचार सुरु असताना त्यांना निधीची कमतरता पडत आहे. रुग्णांना निधीची कमतरता पडू नये याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांनी मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची आज पंढरपूर येथे भेट घेतली. 

यामध्ये श्री. छ. शि. म. सर्वोपचार रुग्णालय येथील ए ब्लॉक (कोव्हिड ब्लॉक) येथे सद्यस्थितीत 50 बेड आय.सी.यु. कोव्हिड रुग्णांकरीता कार्यरत आहेत. येत्याकाळात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असल्यामुळे सद्यस्थितीत आय.सी.यु.मध्ये आणखीन 50 बेड वाढवून एकूण बेडची संख्या 100 बेडस् इतकी करण्याची आवश्यकता आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळण्याकरीता राज्यस्तरीय कमिटी स्थापन करण्याची गरज आहे. तरी सदर कमिटी लवकरात लवकर स्थापन करण्यात यावी. तसेच सद्या सुरु असलेल्या पावसाळी वातावरणात स्नेक बाईट, निमोनिया तसेच विविध साथीचे आजार अशामुळे अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याकरीता नवीन बी ब्लॉक येथे नव्याने नॉन कोव्हिड रुग्णांसाठी 50 बेडचे आय.सी.यु. प्रस्तावित करण्यात आलेले आहे, यासाठी यंत्रसामुग्री व मनुष्यबळाची आवश्यकता आहे याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री यांना निवेदनाव्दारे मागणी केली.

यावेळेस सोलापूरातील कोरोना बाधितांची वाढती संख्या व त्यावर करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यामध्ये सोलापूरातील सिव्हील हॉस्पिटलमध्ये निधीची कमतरता पडत असल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत सोलापूरातील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी कसल्याही परिस्थितीत निधीची कमतरता पडू देणार नाही असे आश्वासन देत याबाबत तेथे हजर असलेले विभागीय आयुक्त दिपक म्हैसकर यांना निर्देश दिले. यावेळी तेथे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक श्री. मनोज पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक अधिकारी डॉ. सुहास वारके हे उपस्थित होते.