बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश; ड्रोन कॅमेऱ्यासह डॉग स्कॉड‌ आले! 

बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश; ड्रोन कॅमेऱ्यासह डॉग स्कॉड‌ आले! 

Order to shoot the leopard

सोलापूर : करमाळा परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून बिबट्या या वन्य प्राण्यांच्या हालचाली दिसून येत आहेत. बिबट्या वन्यप्राण्यांला घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सोलापूर वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

दिनांक 6 डिसेंबर 2020 रोजी प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव महाराष्ट्र राज्य यांनी पुणे व औरंगाबाद प्रादेशिक विभागांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी परवानगी दिली आहे. याअंतर्गत सोलापूर वनविभागाने करमाळा वनपरिक्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी 40 कॅमेरे, तीन बेशुद्धी पथक, 15 पिंजरे, डॉग स्कॉड पथकास पाचारण केले आहेत. तसेच या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पाच हत्यारे पोलिस, शस्त्रधारी वनरक्षक व शार्प शूटर यांना पाचारण करण्यात आले आहे.‌ रेकी करण्यासाठी ड्रोन कॅमेराची मदत घेण्यात येणार आहे. 

वनविभागाने दिलेल्या सूचनांचे पालन पालन सर्वांनी करावे. हा बिबट्या नरभक्षक असून तो एकटाच आवरत आहे. पुढील हानी टाळण्यासाठी करमाळा परिसरात ग्रामस्थांनी जनजागृतीमध्ये सहभाग घ्यावा. बिबट्याच्या हालचालीची माहिती तात्काळ 1926 या क्रमांकावर कळवावी.

नरभक्षक बिबट्या हा तूर, ज्वारी व इतर पिके असलेल्या हजार हजार हेक्टरचे सलग क्षेत्र असल्याने यामध्ये त्याचा शोध घेणे अतिशय कठीण होत आहे. तरीसुद्धा बिबट्या या वन्यप्राण्यांचा शोध घेऊन त्यास जेरबंद करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याला पिंजरा बंद करण्यास तसेच गरजेप्रमाणे बेशुद्ध करून बंदिस्त करण्याची परवानगी प्राप्त झाली आहे. क्षेत्राची भौगोलिक परिस्थिती व इतर कारणांमुळे बिबट्याला जेरबंद बेशुद्ध करणे शक्य न झाल्यास त्यापासून मनुष्यहानी टाळण्यासाठी त्याला ठार मारण्याची परवानगी मिळाली असून पुढील कार्यवाही चालू आहे, असे सोलापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी कळविले आहे.

दरम्यान चिकलठाण परिसरात बिबट्याच्या हल्ल्यामुळे आणखी एका तरुणीचा बळी गेल्याची माहिती समोर येत आहे.