अण्णा तू लवकर घरी ये.. तोपर्यंत मी केक कापणार नाही!

अण्णा तू लवकर घरी ये.. तोपर्यंत मी केक कापणार नाही!

पोलीस कर्मचारी अनिल गवसाने यांनी शेअर केला भावनिक प्रसंग 

सोलापूर : जनतेच्या सुरक्षेसाठी सदैव सज्ज असलेल्या अनेक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. अनेकांना कोरोनावर मात करून पुन्हा ड्युटी सुरु केली आहे. 

सोलापूर शहर पोलिस दलातील पोलिस कर्मचारी अनिल गवसाने यांना कोरोना झाला आहे. ते सध्या गंगामाई रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज त्यांच्या मुलीचा वाढदिवस आहे आणि ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज सकाळी अनिल यांनी आपल्या फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. मुलगी आणि वडील यांच्यातील भावनिक नाते यामधून दिसून येते.

पोस्ट पुढीलप्रमाणे - 

‘सर्वांना आवर्जून सांगावेसे वाटते दोन दिवसांपूर्वी मी कोरोना पॉझिटिव आलो आहे आणि सध्या उपचार घेत आहे. आज माझी कन्या आदिती उर्फ ( चिऊ ) हिचा वाढदिवस असून काल तिला  मी म्हटले की तुला आज वाढदिवसाला काय गिफ्ट पाठवून देऊ.. तर मला आवर्जून सर्वांना सांगावेसे वाटते तिने मला असे उत्तर दिले कि ऐकल्यावर अक्षरशः मला गहिवरुन आले. ती म्हटली अण्णा तू बरा होऊन लवकर घरी आला की आपण वाढदिवस साजरा करू.. तोपर्यंत मी केक कापणार नाही!! 

जेमतेम वय वर्ष पाच इतक्या वयामध्ये इतकी समज कुठून आली असेल? खरंच मुलगी असावी तर अशी इतकी काळजी करणारी. आपणा सर्वांचे शुभ आशीर्वाद सदैव माझ्या अदितीच्या पाठीशी राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना..
हॅपी बर्थडे चिऊ...’

अवघ्या पाच वर्षांची माझी मुलगी खूपच समजदार आहे. तिचा वाढदिवस साजरा करण्याचे प्लॅनिंग ठरले होते मात्र मी आता रुग्णालयात आहे. मी आल्याशिवाय वाढदिवस साजरा करणार नाही असे ती म्हणाली. तिच्या या वाक्यावर मी खूपच भावनिक झालो आहे. 
- अनिल गवसाने, 
पोलीस कर्मचारी