#पदोन्नती : सूर्यकांत पाटील होम डीवायएसपी; अरुण सावंत अप्पर पोलीस अधीक्षक

#पदोन्नती : सूर्यकांत पाटील होम डीवायएसपी; अरुण सावंत अप्पर पोलीस अधीक्षक

सोलापूर : गृह विभागाने राज्यातील पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नत्या गुरुवारी जाहीर केल्या. राज्यातील एकूण 96 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस उपअधिक्षक तसेच अप्पर पोलीस अधीक्षक या पदांवर पदोन्नती देण्यात आली आहे.

गेल्या सहा वर्षांपासून सोलापुरात कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांची सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात मुख्यालय विभागाचे पोलिस उपअधीक्षक (होम डीवायएसपी) म्हणून पदोन्नती झाली आहे. सूर्यकांत पाटील हे सोलापूर शहर वाहतूक शाखेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात विशेष शाखा, गुन्हे शाखा, एमआयडीसी पोलीस ठाणे, फौजदार चावडी पोलीस ठाणे आदी ठिकाणी कर्तव्य बजावले आहे.

सोलापूर ग्रामीणचे प्रदीप जाधव यांची नाशिक ग्रामीण याठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी पदी पदोन्नती झाली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण सावंत यांची अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती या ठिकाणी पदोन्नती झाली आहे. सावंत यांच्याकडे गेल्या वर्षभरापासून ग्रामीण पोलीस  उपाधीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार होता. सोलापूर जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी त्यांनी चांगल्या प्रकारे काम केले आहे. 

विश्वंभर गोल्डे यांची औरंगाबाद शहर या ठिकाणी सहाय्यक पोलीस आयुक्त पदोन्नती झाली आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी कार्यरत असलेले हारुण मुलानी यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र नानविज या ठिकाणी पोलिस उपअधीक्षक पदावर पदोन्नती झाली आहे. येथील पोलिस निरीक्षक संजयकुमार बोठे यांची ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक म्हणून पदोन्नती झाली आहे. 

पूर्वी सोलापुरात कर्तव्य बजावलेले तसेच सध्या पुणे शहर या ठिकाणी पोलिस निरीक्षक असलेले अरुण वायकर यांची भंडारा या ठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे.