ओवेसींच्या वाहनावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला बक्षीस

ओवेसींच्या वाहनावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला बक्षीस

Police officer ramesh chintakindi news

सोलापूर : ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद ए मुस्लिमीनचे (AIMIM) राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांची जाहीर सभा हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती. नंबर प्लेट नसलेल्या वाहनातून ते सोलापुरात आले होते.

खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे सोलापुरात आगमन झाल्यानंतर सर्व पदाधिकारी शासकीय विश्रामगृह येथे जमले होते. खासदार असदुद्दीन ओवेसी हे ज्या वाहनातून सोलापुरात आले त्या वाहनाला नंबर प्लेट नसल्याने वाहतूक शाखेच्या पोलिस कारवाईसाठी पुढे आले. नंबर प्लेट नसल्याबद्दल दोनशे रुपयांचा दंड करण्यात आला. शहर जिल्हाध्यक्ष फारुक शाब्दी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी दंड भरून पोलिसांना सहकार्य केले.

विश्रामगृहावर बंदोबस्तासाठी पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रकांत वाबळे, सहायक पोलीस निरीक्षक रमेश चिंताकिंदी आणि त्यांच्या पथकाने नंबर प्लेट नसल्याबद्दल दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईबद्दल पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी सहायक पोलिस निरीक्षक रमेश चिंताकिंदी यांना 5 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

कोण आहेत रमेश चिंताकिंदी? 

वाहतूक शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश चिंताकिंदी हे गेल्या पाच वर्षांपासून सोलापुरात कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे येथे सेवा बजावली आहे. ते मूळचे सोलापूरचे असून 2010 साली महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाले.