आईचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला! आणि मग...

आईचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला! आणि मग...

युवा लेखक प्रतिक पाटील यांची प्रेरणादायी मांडणी

आज 10 सप्टेंबर, आजपासून बरोबर 3 महिन्यांपुर्वी म्हणजेच 10 जून 2020,  माझी आई न्यूमोनियाच्या आजाराने त्रस्त होती आणि साहजिकच शुगर-बीपीचा त्रास असल्यामुळे डॉक्टरांनी कोविड (कोरोना)ची टेस्ट करायला सांगितली होती. त्याचा अहवाल आजच्या दिवशी आला होता... जो पॉजिटीव्ह होता...त्या आधीच्या 3-4 दिवसांपूर्वीच स्वब घेतले गेले होते आणि तो अहवाल निगेटिव्ह यावा म्हणून मी आमच्या भागातल्या प्रत्येक मंदिराची घंटा वाजवली...

रस्त्यात भेटणाऱ्या ओळखीच्या लोकांकडून जेव्हा आईच्या तब्येतीची विचारपूस व्हायची तेव्हा मीच त्यांना तो अहवाल निगेटिव्ह येईल असं म्हणायला प्रवृत्त करायचो.माझी माझ्या आईवर असलेली भोळी श्रद्धा, अपार प्रेम  मला ती गोष्ट करायला प्रवृत्त करायची.अक्कलकोटच्या स्वामींवर माझी नितांत श्रद्धा..माझा म्हणण्यापेक्षा माझ्या कुटूंबातल्या प्रत्येकाचा खूप विश्वास आहे त्यांच्यावर...वाटलं होतं रिपोर्ट निगेटिव्ह येईल पण पॉजिटीव्ह आला...संपलं सगळं... 

     दुपारी 1 ची वगैरे वेळ असेल जुळे सोलापूरच्या मोनार्क हॉस्पिटलच्या पार्किंग मध्ये असताना मला रिपोर्ट कळला होता.. तो फोन झाला आणि अगदी मिनिटातच आईचा फोन आला "प्रतिक वर ये कि, जेवण करूयात" मी विचार केला आपण इतक्यात नको सांगायला. आईला रिपोर्ट कळला तर ती पूर्णपणे खचेल आणि indirectly तिची शुगर वाढेल...जेवणार पण नाही ती... situation पुन्हा क्रिटिकल होईल...मी त्यादिवशी माझ्या चेहऱ्यावर कसलाही अविर्भाव न दाखवता माझ्या आयुष्यातले ते जड घास तोंडात कसे कोंबले आणि ते कसे पचवले स्वामीं साक्षीदार आहेत त्याचे...
      इकडे आईला आणि बाबांना कणभर सुद्धा जाणवू द्यायचं नव्हतं कि, तुमचा मुलगा खचला आहे...शेवटी मी पण माणूसच...संयम सुटला आणि हॉस्पिटलच्या टॉयलेट मध्ये जाऊन खूप रडलो...असं वाटलं कि स्वामींनी माझी साथ सोडली...आणखी रडलो... पराभव... पण रिपोर्ट आल्यानंतरच्या दुसऱ्या दिवसापासून आईच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली आणि 18 जूनला  त्यादिवशी गुरुवार होता...म्हणून डॉक्टरांनी सुद्धा त्याच दिवशी डिस्चार्ज दिला.. आणि घरी आल्यानंतर तब्बल 19 दिवसांनी आम्ही चौघांनी एकत्र स्वामींची पूजा केली...जिंकवलं होतं स्वामींनी आम्हाला... 
   मला माहिती नाही तुम्ही देव वगैरे मानता नाही मानत... पण तुम्हाला सांगू तुमच्या अंतर्मनातील नितळ श्रद्धा असते ना ती तुम्हाला तारत असते...कुणावरही अविश्वास दाखवा पण त्या श्रद्धेवर कधीच अविश्वास दाखवू नका...
     डॉ. अविनाश कुलकर्णी...अत्यंत संयमी व्यक्तिमत्व..त्यांचा मूळ पिंड ऑर्थोपेडीक.... हाडाचे डॉक्टर... पण तरीही त्यांनी त्यांच्या हातात होती ती गोष्ट अत्यंत प्रामाणिकपणे केली...त्या काळात रात्री 10-12-1 कधीही फोन करा ही व्यक्ती फोन उचलणारच.. आम्हाला आधार दिला...आत्मविश्वास जागृत केला...खूप ग्रेट असतात हो अशी माणसं... खचलेल्या तुम्हाला जगायला शिकवतात...उभं राहायला शिकवतात.
   पण आज तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो... मी मला आलेल्या अनुभवातून शिकलो आणि आजपर्यंत जवळपास सोलापुरातल्या साधारण 30-40 कोरोना झालेल्या लोकांना मदत केली...कशी ? त्यांना प्रत्यक्ष कधीच भेटलो नाही...अनेकांना तर मी कधीच भेटलो नव्हतो...फक्त फोनवरून कुठे बेड उपलब्ध होईल का ? नसेल होत तर डॉक्टरांना अत्यंत शांतपणे त् विनंती करून काही करता येईल का हे विचारणं ? तुमच्या संपर्कातलं कोणतं हॉस्पिटल आहे का जिथे सोय होऊ शकते...पेशंटच्या नातेवाईकांना रोज एखादातरी फोन करून विचारण... त्यांना त्यांच्यातल्या आत्मविश्वास जागृत करणं इतकं छोटसंच काम मी माझं वैयक्तिक काम सांभाळून करतोय...तेही फोनवरून...काय लागतं याला रु.199 चा महिन्याचा रिचार्ज... आणि इच्छाशक्ती.... 
     यातून मला काय मिळालं....खरं सांगू मला माझी माणसं मिळाली...मी माझ्या आईचे संस्कार प्रत्यक्षात उतरवले याचाच खूप मोठा आनंद आहे...मित्रांनो जग खूप सुंदर आहे रे त्याला तुम्हीच आणखी सुंदर बनवू शकता...

- प्रतिक पाटील
सोलापूर