२२ ते २४ ऑक्टोबर 'प्रिसिजन गप्पा'; वाचा काय आहे मेजवानी

२२ ते २४ ऑक्टोबर 'प्रिसिजन गप्पा'; वाचा काय आहे मेजवानी

'म्युझिक कॅफे' : भारतीय डिजिटल पार्टी आणि अभंग रिपोस्टच्या टीमचा अनोखा सांगीतिक कार्यक्रम

'हृदयी वसंत फुलताना' : अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या लोकप्रिय दांपत्याशी दिलखुलास गप्पा

'सामाजिक पुरस्कार' : तुळजाई प्रतिष्ठान (उस्मानाबाद)  व रॉबिनहूड आर्मी (सोलापूर). सामाजिक कार्यकर्त्या रेणूताई गावस्करांशी संवाद

सोलापूर : प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने येत्या २२, २३ आणि २४ ऑक्टोबर रोजी 'प्रिसिजन गप्पा' आयोजिण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाचे यंदा १३ वे पर्व आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रसिकश्रोत्यांना घरबसल्या 'प्रिसिजन गप्पां'चा आनंद घेता यावा या उद्देशाने यंदाच्या सलग दुसऱ्या वर्षीही हा कार्यक्रम ऑनलाईन प्रक्षेपित होणार आहे. प्रिसिजन कॅमशाफ्ट्सचे चेअरमन श्री. यतिन शहा आणि प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी पत्रकार परिषदेत २०२१ सालच्या 'प्रिसिजन गप्पां'बाबत माहिती दिली.

शुक्रवारी दि. २२ ऑक्टोबर रोजी पहिल्या दिवशी 'म्युझिक कॅफे' हा अनोखा सांगितिक कार्यक्रम अनुभवता येईल. भाडिपा अर्थात भारतीय डिजिटल पार्टी हा यूट्यूब चॅनल आणि त्यांचा अभंग रिपोस्ट हा कार्यक्रम सध्या चर्चेत आहे. या संकल्पनेबद्दल मानसी जोशी, सारंग साठे, निपुण धर्माधिकारी यांच्या रंगलेल्या भन्नाट गप्पा रसिकांना ऐकायला मिळतील. प्रतिश म्हस्के, अजय वव्हाळ, स्वप्नील तर्फे, तुषार तोत्रे, विराज आचार्य, दुष्यन्त देवरुखकर या अभंग रिपोस्टच्या टीमने सादर केलेला 'म्युझिक कॅफे' यंदाच्या गप्पांचं वैशिष्ट्य ठरेल.

शनिवारी दि. २३ ऑक्टोबर रोजी गप्पांच्या दुसऱ्या दिवशी तळमळीने सामाजिक कार्य करणाऱ्या दोन संस्थांना गौरविण्यात येईल. मतीमंद मुलींना 'स्वआधार' देत मायेचं पांघरूण घालणाऱ्या तुळजाई प्रतिष्ठान (उस्मानाबाद) या संस्थेला २०२१ सालचा प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. सन्मानचिन्ह आणि रुपये तीन लाख अशा स्वरूपाचा हा पुरस्कार संस्थेच्या वतीने श्री. शहाजी चव्हाण हे स्वीकारतील. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्या लोकांपर्यंत भोजन पोहोचवून सातत्यपूर्ण अन्नसेवा करणाऱ्या रॉबिनहूड आर्मीला (सोलापूर) २०२१ सालचा 'स्व. सुभाष रावजी शहा स्मृति पुरस्कार' देऊन गौरविण्यात येईल. सन्मानचिन्ह आणि रुपये दोन लाख अशा स्वरूपाचा हा पुरस्कार संस्थेच्या वतीने श्री. हिंदुराव गोरे हे स्वीकारतील. रॉबिनहूड आर्मी आर्थिक मदत किंवा देणगी स्वीकारत नाही. त्यामुळे पुरस्काराची रक्कम रॉबिनहूड आर्मीच्या उपक्रमांसाठी भोजन व्यवस्था करणाऱ्या अनिता उबाळे यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मा. रेणूताई गावस्कर यांच्या हस्ते यंदाचा पुरस्कार प्रदान सोहळा होईल. त्यानंतर रेणूताईंच्या उत्तुंग कार्यावर श्री. मिलिंद वेर्लेकर हे मुलाखतीच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकतील.

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या लोकप्रिय जोडीची प्रकट मुलाखत ही यंदाच्या गप्पांमधील पर्वणी असेल. रविवारी दि. २४ ऑक्टोबर रोजी 'ह्रदयी वसंत फुलताना' या कार्यक्रमाच्या माध्यमातून सिनेरसिकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या या दांपत्याची वाटचाल उलगडेल. ऋषिकेश जोशी यांनी सराफ दांपत्याशी साधलेल्या संवादातून रुपेरी पडद्यावरील आणि पडद्यामागील अनेक भन्नाट किस्से रसिकांना ऐकायला मिळणार आहेत.

प्रिसिजनच्या प्रथेप्रमाणे तीनही दिवस सायंकाळी ६.२५ वाजता गप्पांना प्रारंभ होईल. प्रिसिजन फाउंडेशनच्या फेसबुक पेजवर रसिकश्रोत्यांनी गप्पांची दिवाळी घरबसल्या मनसोक्त अनुभवावी असं आवाहन प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलं आहे.

प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी संगीतलेली माहिती पहा-