‘म्युझिक कॅफे’च्या अनोख्या सांगीतिक मैफिलीने रंगल्या प्रिसिजन गप्पा!

‘म्युझिक कॅफे’च्या अनोख्या सांगीतिक मैफिलीने रंगल्या प्रिसिजन गप्पा!

Precision-gappa-22-oct-2021-news

कार्यक्रमाचा पूर्ण व्हिडिओ पहा-

सोलापूर : आपली नस पकडेल अशा प्रकारचा डिजिटल कंटेंट भारतीय तरुणाईला हवा आहे. 'भाडिपा' अर्थात भारतीय डिजिटल पार्टी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तो देण्याचा प्रयत्न केला. स्टँडअप कॉमेडी आणि ड्रामा या दोन्ही प्रकारातून मिळत असलेला हा कंटेंट तरुणाईला आवडतोय याचा खूप आनंद आहे, असं प्रतिपादन भाडिपा या लोकप्रिय यूट्यूब चॅनलचे संस्थापक सारंग साठ्ये आणि निपुण धर्माधिकारी यांनी व्यक्त केलं. 

प्रिसिजन फाऊंडेशन आयोजित प्रिसिजन गप्पांच्या १३ व्या पर्वाची सुरुवात 'म्युझिक कॅफे' या अनोख्या सांगितिक मैफिलीने झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही सलग दुसऱ्या वर्षी हा तीन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम ऑनलाईन प्रक्षेपित करण्यात आला.


'प्रिसिजन गप्पां'च्या पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात अभिनेत्री मानसी जोशीने सारंग आणि निपुण या अभिनय क्षेत्रातील लोकप्रिय तरुण जोडगोळीशी संवाद साधत 'भाडिपा'चा प्रवास उलगडला. पुरुषोत्तम करंडकाच्या निमित्ताने एकांकिकेसाठी एकत्र आलेल्या या जोडगोळीने भारतीय विशेषतः मराठमोळ्या तरुणाईला आवडेल असा डिजिटल कंटेंट देण्याचं ठरवलं. त्यातून २०१४ मध्ये 'भारतीय डिजिटल पार्टी' या यूट्यूब चॅनलचा जन्म झाला. रिमा लागू, राधिका आपटे यांच्यासह मराठीतील अनेक सेलेब्रिटीनी यामध्ये सहभाग नोंदवला. २०१९ मध्ये भाडिपाचा ऑस्ट्रेलियामध्ये पहिला लाईव्ह शो झाला. स्टँडअप कॉमेडी आणि ड्रामा यांचा वापर करून वेगळ्या प्रकारचा कंटेंट निर्माण केला व तो तरुणाईने अक्षरशः डोक्यावर घेतला. मानसीने विचारलेल्या रॅपिड फायर राउंडमध्येही या दोघांनी धमाल उडवून दिली.

दुसऱ्या सत्रात रसिकांना रिपोस्ट केलेल्या अभंगांची अनोखी पर्वणी मिळाली. 'अभंग रिपोस्ट' हा सध्या महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय असा बँड आहे. टाळ-चिपळ्यांच्या साथीने सादर होणारे आपल्या संतांनी रचलेले अभंग शुक्रवारी मात्र चक्क वेस्टर्न म्युझिकच्या साथीने ऐकायला मिळाले. प्रतिश म्हस्के, अजय वव्हाळ, स्वप्नील तर्फे, तुषार तोत्रे, विराज आचार्य, दुष्यंत देवरुखकर या अभंग रिपोस्टच्या टीमने वेस्टर्न बीट्सवर धरलेला 'विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल' रसिकांना बसल्याजागी पंढरीदर्शनासाठी घेऊन गेला. 

"देव बाजारचा भाजीपाला नाही हो...लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा... कशाला पंढरी जातो...देह देवाचे मंदिर" असे अभंग वेस्टर्न बीट्सच्या साथीने रिपोस्ट झालेलं पाहणं ही रसिकांसाठी एक पर्वणीच ठरली.

सायंकाळी ६.२५ वाजता प्रिसिजनच्या स्वागतगीताने 'प्रिसिजन गप्पां'चा शुभारंभ झाला. प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते सर्व पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला.

आज प्रिसिजन सामाजिक पुरस्कार वितरण
प्रिसिजन गप्पांमध्ये आज म्हणजे शनिवार दि. २३ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रिसिजन सामाजिक पुरस्कारांचे वितरण होईल. तुळजाई प्रतिष्ठान (उस्मानाबाद) आणि रॉबिन हूड आर्मी (सोलापूर) यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणूताई गावस्कर यांच्या हस्ते गौरविण्यात येईल. त्यानंतर मिलिंद वेर्लेकर यांनी प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून रेणूताईंशी साधलेला संवाद पाहता येईल.