अशोक आणि निवेदिता सराफ यांनी फुलविला हृदयी वसंत!

अशोक आणि निवेदिता सराफ यांनी फुलविला हृदयी वसंत!

Precision gappa news 24 Oct 2021

कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडिओ पहा-शोधक वृत्ती ही अभिनयाच्या इंडस्ट्रीत टिकण्यासाठीची गुरूकिल्ली

प्रिसिजन गप्पा : 'हृदयी वसंत फुलताना'ने रविवारची सायंकाळ झाली सुखद, अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या जोडप्याशी मनमुराद गप्पा

सोलापूर : प्रत्येकवेळी छान, अपिलिंग भूमिकाच मिळेल याची खात्री नसते. मिळालेल्या भूमिकेत आपल्याला काय वेगळेपण देता येईल याचा शोध कलाकाराने घ्यायचा असतो. शोधक वृत्ती ही अभिनयाच्या इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठीची गुरुकिल्ली आहे. भूमिका साकारताना येणाऱ्या अनुभवातूनच कलाकार समृद्ध होत जातो, असं प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी केलं.

२०२१ सालच्या 'प्रिसिजन गप्पां'चा समारोप 'हृदयी वसंत फुलताना' या भन्नाट कार्यक्रमाने झाला. नाट्य आणि चित्रपटसृष्टीवर प्रदीर्घ काळ अधिराज्य गाजविणाऱ्या अशोक आणि निवेदिता सराफ या लोकप्रिय जोडप्याची प्रकट मुलाखत रसिकांसाठी पर्वणी ठरली. अभिनेते-निवेदक हृषीकेश जोशी यांनी खुमासदार शैलीत सराफ दांपत्याला बोलतं केलं.

बालपणीच अशोक आणि निवेदिता या दोघांच्याही अवतीभवती अभिनयाची आवड निर्माण व्हावी असं वातावरण होतं. वयाच्या ७ व्या वर्षी एकांकिकेत काम करून पारितोषिक मिळवणाऱ्या अशोक सराफांनी तारुण्यात काही काळ बँकेचीही नोकरी केली. परंतु अभिनय हेच आयुष्य मानल्याने ते फार काळ तिथं रमले नाहीत. 'दोन्ही घरचा पाहुणा' हा त्यांचा पहिला सिनेमा असला तरी त्यांना स्टारडम मात्र 'पांडू हवालदार'नेच मिळवून दिलं. 

वयाच्या ५ व्या वर्षी लघुनाट्यात काम करणाऱ्या निवेदिता यांनीही पूर्णवेळ अभिनेत्री होण्याचं स्वप्न बाळगलं होतं. वयाच्या दहाव्या वर्षी 'अमृतवेल' आणि 'हे बंध रेशमाचे' या नाटकांमध्ये महत्वाच्या भूमिका त्यांनी साकारल्या. मराठी आणि गुजराती रंगभूमीवर पाय रोवल्यानंतर १९८४ च्या 'धूमधडाका'मधून त्यांनी रुपेरी पडद्यावर एंट्री केली.

त्यानंतर आजतागायत या दोघांच्याही करिअरचा ग्राफ चढताच राहिला. दोन तास रंगलेल्या या मुलाखतीत पडद्यावरचे आणि पडद्यामागचे अनेक किस्से रसिकांसमोर उलगडले गेले. लग्नानंतर 'तू सुखकर्ता' हा चित्रपट वगळता एकाही चित्रपटात या दोघांनी एकत्र काम करण्याचा योग जुळून आला नाही हे विशेष.

अशोक सराफ आणि 'लिटिल मास्टर' सुनिल गावस्कर हे बालपणी एकत्र क्रिकेट खेळले आहेत. इतकंच नव्हे तर 'गुरूदक्षिणा' या नाटकात दोघांनी कृष्ण-बलराम यांच्या भूमिका केल्या होत्या. निवेदिता यांना एका नाटकाच्या प्रयोगावेळी प्रेक्षकांत बसून स्वेटर विणणाऱ्या महिलेचा त्रास झाला होता. प्रेमात पडल्यानंतर निवेदिता यांनी अशोक सराफांना एक तास वाट बघायला लावली होती. असे असंख्य अचंबित करणारे किस्से या मुलाखतीचे वैशिष्ट्य ठरले.

"अशोक सराफ हा स्वतःशी अत्यंत प्रामाणिक असणारा माणूस आहे पण तो अजिबात तंत्रस्नेही नाही" अशी टिप्पणी निवेदिता यांनी नवरोबांबद्दल केली तर "निवेदिता ही खूप संयमी असली तरी वेळ अजिबात पाळत नाही" अशी लाडिक तक्रार अशोकमामांनी मांडली. एकूणच या जोडप्याच्या सहजीवनातील अनुभवांनी रसिकांची रविवारची संध्याकाळ सुखद केली.

तुला इच्छित वर प्राप्त होवो !
अशोक सराफ आणि निवेदिता जोशी यांच्यात प्रेमाचे अंकुर फुलायला लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगांवकर कारणीभूत ठरले आहेत. 'धूमधडाका' चित्रपटात यदुनाथ जवळकर पात्र रंगवणारे अशोक हे निवेदिताला 'तुला इच्छित वर प्राप्त होवो' असा आशिर्वाद देतात. तो मीच असेन हे माहित असतं तर मी तो सीन केला नसता, असं अशोक सराफांनी मिश्कीलपणे सांगितलं. यावरुन मुलाखतीमध्ये हास्याचे फवारे उडाले.

'बबड्याच्या आई'ने दिली नवी ओळख
नायकप्रधान काळातील सिनेमांमध्ये मला फार वाव मिळाला नाही. माझ्या काही चांगल्या भूमिका प्रेक्षकांपर्यंत पोचल्या नाहीत. मात्र १४ वर्षांच्या गॅपनंतर छोट्या पडद्यावरचं पुनरागमन महत्वाचं ठरलं. या सेकंड इनिंगमध्ये 'बबड्याच्या आई'ने मला वेगळी ओळख मिळवून दिली, असं निवेदिता सराफ यांनी स्पष्ट केलं. पन्नाशीत पोचल्यावर कलाकार अनुभवी, हुशार होतो. पण तरीही तो मागे फिरून तारुण्यातल्या भूमिका करू शकत नाही, ही खंतही त्यांनी व्यक्त केली.