उपमहापौर राजेश काळे यांना गुन्हे शाखेने केली अटक

उपमहापौर राजेश काळे यांना गुन्हे शाखेने केली अटक

Rajesh Kale News

सोलापूर : महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी उपमहापौर राजेश काळे यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

नियमबाह्य कामासाठी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर आणि उपायुक्त धनराज पांडे यांना शिवीगाळ करणे तसेच खंडणी मागण्याचे गंभीर आरोप उपमहापौर राजेश काळे यांच्यावर आहे. उपमहापौर राजेश काळे यांची भारतीय जनता पार्टीने उपमहापौर पदावरुन हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपसह विरोधी पक्षाकडून करण्यात आली आहे. 

जुळे सोलापूर येथील लोकमंगल प्रतिष्ठानच्या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी इ -टॉयलेटसह अन्य आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी उपमहापौर राजेश काळे यांनी पालिका उपायुक्त धनराज पांडे यांना फोनवरून अर्वाच्च शिवीगाळ केली. ही कामे नियमबाह्य असल्याचे सांगत यासाठी पत्र व्यवहार होणे अपेक्षित असल्याचं पांडे यांनी उपमहापौर राजेश काळे यांना सांगितले. त्यावर संतापलेल्या काळे यांनी पांडे यांना अर्वाच्य शिवीगाळ केली.

या घटनेनंतर महापालिका अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ महापालिका कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. काळे यांना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर उपमहापौर काळे फरार झाले होते. 

सोलापूर गुन्हे शाखेच्या पथकाने टेंभुर्णी परिसरात उपमहापौर राजेश काळे यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बंडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कुंभार, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने उपमहापौर काळे यांना अटक केली आहे.