झेंड्याप्रमाणे राज ठाकरे स्वतःच्या भूमिकांचे रंग बदलत आहेत : आठवले

झेंड्याप्रमाणे राज ठाकरे स्वतःच्या भूमिकांचे रंग बदलत आहेत : आठवले

Ramdas Athawale on Raj Thakarey Solapur

सोलापुर : राज ठाकरे हे सातत्याने झेंड्याचे आणि स्वतःच्या भूमिकांचे रंग बदलत आहेत. आता ते भगवा रंग अंगावर घेऊन समाजात द्वेष माजवण्याचे कार्य करत आहेत .वास्तविक पाहता भगवा रंग हा शांतीचा वारकरी सांप्रदायाचा रंग आहे हे त्यांनी ध्यानात घ्यावं. राज ठाकरे यांच्या भोंग्या संबंधातील भूमिकेशी आम्ही अजिबात सहमत नाही, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज सोलापूर दौर्‍यावर आहेत .शासकीय विश्रामगृह येथे सकाळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. राज ठाकरे यांनी मशिदीवरील स्पीकर काढावेत त्यांच्या समोर जाऊन हनुमान चालीसा वाचण्याची भूमिका घेतली आहे  हा प्रश्न सामाजिक नसून धार्मिक स्वरूपाचा आहे. धर्माचा बुरखा घालून कोणी संविधाना विरोधात काम करत असेल तर आमचा त्यांना विरोध असेल.

आठवले म्हणाले, सोलापुरात मुस्लिम समाजाच आपल्याला निवेदन आल आहे. पोलीस बळजबरीने राज ठाकरे यांच्या सांगण्यावरून मशिदी वरील स्पीकर काढायला लावत आहेत. पोलिसांनी अशी भूमिका घेऊ नये .कायद्याचं पालन करावं. धार्मिक स्थळावरील स्पीकर उतरवताना समान भूमिका प्रशासनाने घेतली पाहिजे. राज ठाकरे यांना एनडीएमध्ये घेण्याची गरज नाही. रिपाई मोदी सरकार बरोबर असताना राज ठाकरे यांची गरजच काय? असा सवालही आठवले यांनी केला. ओबीसी आरक्षण असो किंवा मराठा समाजाला मिळणार आरक्षण असो राज्य सरकार सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यास अपयशी ठरलं आहे. आता या सरकारची जबाबदारी आहे, उभयतांना आरक्षण मिळवून द्यावं. भूमिहीनांना देशात प्रत्येकी पाच एकर जमीन कसण्यासाठी द्यावी. 20 कोटी एकर अतिरिक्त जमीन शिल्लक आहे असं सांगून आठवले म्हणाले, दोन हजार पर्यंतच्या गायरान वरील अतिक्रमणाच्या जागा संबंधितांच्या नावे कराव्यात. तसेच 2019 पर्यंतच्या झोपड्याअधिकृत कराव्यात अशी आमची मागणी आहे.

पेट्रोलजन्य पदार्थ वरील कर केंद्राने कमी केले पण राज्य सरकारने ते कमी केले नाहीत आणि म्हणूनच महागाईचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत आहे. राज्य सरकार आपल्या भूमिका नीट पार पाडत नाही आणि केंद्राकडे सातत्याने बोट ही दाखवतं ही त्यांची भूमिका आयोग्य आहे. काहीही झालं तरी आगामी निवडणुकीत केंद्रात पुन्हा एनडीएचे सरकार येणार. यात भाजपला 350 जागा मिळतील तर आघाडीला 400 पेक्षा जास्त जागा मिळतील. राज्यातील सरकार पडावं अशी इच्छा आहे पण पडत नाही पण पडेल तेव्हा भारतीय जनता पार्टी बरोबर आम्ही येथे चांगलं सरकार बनवू असा दावाही त्यांनी केला. इडी चौकशी कोणत्याही त्वेष भावनेनं, सरकारच्या सांगण्यावरून होत नाही. ई डी. हा स्वतंत्र विभाग आहे असेही त्यांनी एका उत्तरात स्पष्ट केलं. आगामी महापालिका निवडणुकात भारतीय जनता पार्टीबरोबर मुंबई आणि अन्य महापालिकात ही आमची युती राहील आणि सर्वत्र आमची सत्ता येईल असा दावाही आठवले यांनी केला. संभाजी भिडे यांना भीमा कोरेगाव प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली पण त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे यासाठी आपण राज्याच्या गृहमंत्र्यांशी बोलणार आहोत असेही आठवले म्हणाले.

पत्रकार परिषदेस रिपाईचे राजा सरवदे, के.डी कांबळे आदी उपस्थित होते