ग्रेटच.. पर्यावरणप्रेमी तरुणांमुळे वडाच्या झाडाला मिळाले जीवनदान!

ग्रेटच.. पर्यावरणप्रेमी तरुणांमुळे वडाच्या झाडाला मिळाले जीवनदान!

सोलापूर : पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने महत्त्वाची बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. सोलापूर- सांगली या महामार्गाचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. सोलापूर शहरापासून 7 किमी अंतरावर मंगळवेढा रोड रोडवर एके ठिकाणी असलेले वडाचे झाड तोडू नये, या झाडाचे पुनर्रोपण करावे या पर्यावरणप्रेमी तरुणांच्या मागणीला यश आले आहे.

स्मार्ट रोड सेफ्टी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, पर्यावरणप्रेमी गणेश शिलेदार यांनी मंगळवेढा रोडवरील वडाचे झाड तोडू नये यासाठी पुढाकार घेतला. समविचारी मित्रांच्या मदतीने नॅशनल ऑथोरिटी ऑफ इंडियाचे प्रकल्प अधिकारी संजय कदम यांच्याकडे वडाच्या झाडासंदर्भात पाठपुरावा करण्यात आला.

शनिवारी सकाळी वडाच्या झाडाचे पुनर्रोपण करण्यात आले. मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर हे झाड पुन्हा एकदा लावण्यात आले आहे. वडाचे झाड वाचवण्यासाठी प्रा. सारंग तारे (सदस्य, जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, सोलापूर), श्री. विश्वनाथ गायकवाड (भारतीय व्यापार नौदल अधिकारी), श्री. भाऊराव भोसले (सचिव, सायकलिस्ट फाऊंडेशन, सोलापूर), श्री. रजनीकांत जाधव, छायाचित्रकार यशवंत सादूल यांचे सहकार्य मिळाल्याचे गणेश शिलेदार यांनी सांगितले आहे.

पर्यावरण संवर्धनाचा विचार करून वडाचे झाड वाचवण्यासाठी गणेश शिलेदार यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल स्मार्ट सोलापूरकर परिवाराच्यावतीने अभिनंदन..