प्रामाणिकपणाबद्दल पोलीस अंमलदाराला बक्षीस!

प्रामाणिकपणाबद्दल पोलीस अंमलदाराला बक्षीस!

शेतकऱ्याचे हरविलेले पैसे परत केल्याबद्दल पोलीस अंमलदार यांचा पोलीस आयुक्त यांचेकडुन सन्मान

सोलापूर : दि.१४/११/२०२१ रोजी पोलीस अंमलदार परशुराम केंचनाळ हे शांतीचौक येथे कर्तव्य बजावत होते. कारवाई करीता वाहने थांबवुन त्यांची तपासणी करुन सोडण्यात येत होते. 

त्या दरम्यान पोलीस अंमलदार परशुराम केंचनाळ यांना रस्त्यावर एक पाकीट मिळुन आले. पाकिटाची पाहणी केली असता त्यामध्ये रोख रक्कम ११ हजार मिळुन आले. रक्कम कोणाची आहे याबाबत कोणतीही माहिती नव्हती. म्हणुन रक्कम पोलीस अंमलदार यांनी त्यांचे जवळ सुरक्षीत ठेवली. शेतकरी महादेव रासुरे यांना त्यांचे पैसे हरवलेले लक्षात आल्यानंतर आता काय करायचे या विचारात निराश मनाने ते आलेल्या मार्गाने शोध घेत शांती चौकात आले. इतरत्र त्यांच्या हरवलेल्या पैशाचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार परशुराम केंचनाळ यांना शेतकरी महादेव रासुरे हे दिसले तेव्हा पोलीस अंमलदार केंचनाळ हे शेतकऱ्याचे जवळ जावुन काय झाले? याबाबत विचारणा केली. तेव्हा शेतकरी रासुरे यांनी पोलीस अंमलदार यांना सदर हकिकत सांगीतली. त्यानंतर पोलीस अंमलदार यांनी खात्री करुन शेतकरी महादेव रासुरे यांना त्यांची हरवलेले रोख रक्कम रुपये ११ हजार परत केले. रक्कम शेतकरी यांना परत मिळताच त्यांच्या डोळयात आनंदाश्रू आले व ते भावनीक होवुन पोलीस अमंलदार व पोलीस खात्याचे आभार मानले.

पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी पोलीस अंमलदार परशुराम तिमप्पा केंचनाळ यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगीरीबाबत त्यांना अकरा हजार एक रुपये रोख रक्कम देऊन त्यांचा सत्कार केला. पोलीस आयुक्त सोलापुर शहर यांनी इतर पोलीसानीही चांगले काम करावे, पोलीस दलाची प्रतिमा उजळावी या करिता तसेच इतर पोलीस अंमलदार यांना चांगले काम करण्याची प्रेरणा मिळावी म्हणुन प्रोत्साहित करण्याच्या उददेशाने जाणुन बुजुन शेतकऱ्याची हरवलेली रकमेपेक्षा जास्त रक्कम पोलीस अंमलदार यांना बक्षीस म्हणुन देवुन गौरवण्यात आले आहे.