केगाव परिसरात आढळला दुर्मिळ रसल्स कुकरी साप!

केगाव परिसरात आढळला दुर्मिळ रसल्स कुकरी साप!

सोलापूर :- काल 22 जून 2022 रोजी रात्री 7:30 वाजता केगाव येथील रहिवासी गणेश बसवंती यांच्या घरात एक लहान सापाचे पिल्लू घरात निघाल्याने कुटूंबातील व्यक्ती घाबरले होते. 

त्या सापाच्या पिल्लाला मारावं की, कुणाला तरी पकडायला बोलवावं हा प्रश्न गणेश व त्यांच्या घरातल्या लोकांना पडला होता. तेवढ्यात बसवंती यांच्या लक्षात आले की, त्यांचे वर्गमित्र WCAS चे सुरेश क्षीरसागर हे सर्परक्षक असून त्यांना ही घटना फोनवर कळवावी. त्यावेळी क्षीरसागर यांनी गणेश यांना घाबरू नका त्या सापांचा फोटो मला वॉट्सप वर पाठवा असे सांगितले.

क्षणाचाही विलंब न करता बसवंती यांनी WCAS चे सुरेश क्षीरसागर यांना त्या सापाचे फोटो मोबाईलमध्ये काढून पाठवला. फोटो पाहिल्यानंतर तो अंत्यत दुर्मिळ रसल्स कुकरी बिनविषारी साप आहे असे त्यांना सांगितले. साधारण 6 ते 7 सेमी लांबीचे आहे आणि त्या सापाला मारू नका एक प्लास्टिक बरणी घ्या आणि त्या सापाच्या तोंडासमोर बरणी आडवी धरा, तो साप त्या बरणीत जाईल व नंतर बरणीला टोपण लावण्यास सांगितले. अशा प्रकारे त्या सापाला पकडण्यासाठी क्षीरसागर यांनी मोबाईलवरुनच योग्य मार्गदर्शन केले. त्यामुळे त्या दुर्मिळ रसल्स कुकरी बिनविषारी सापाला जीवदान मिळाले. 

तो साप बसवंती यांनी WCAS चे सुरेश क्षीरसागर यांच्या स्वाधीन केला. क्षीरसागर यांनी त्या सापांची पाहणी करून पुन्हा त्याच परिसरात निसर्गाच्या सानिध्यात सुखरूप सोडून दिला.

मराठी नाव : रसल्स कुकरी बिनविषारी
इंग्रजी : Russell's Kukri Snake 
शास्त्रीय:Oligodon taeniolatus 
लांबी : १ ते १.५ फुट 
वैशिष्ट्ये : गोल शरीर , आखुड शेपटी तसेच फिकट शरीर व त्यावर पांढरे गडद तपकिरी आडवे पट्टे असतात . गवताळ भाग , दगडांच्या कपारी तसेच शेतीच्या आसपास हा साप आढळतो . भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत आढळून येतो .

खाद्य : लहान पाली , आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांची अंडी खातो . 
प्रजनन : मादी ७ ते ८ अंडी घालते व जून ते जुलै महिन्यात या सापांची पिल्लं जन्माला येतात.