रोहन देशमुखांनी केली होती तयारी पण संग्राम देशमुखांना लॉटरी

रोहन देशमुखांनी केली होती तयारी पण संग्राम देशमुखांना लॉटरी

सोलापूर : पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून संग्राम देशमुख यांचे नाव फायनल झाले आहे.

संग्राम देशमुख सध्या सांगलीचे जिल्हाध्यक्ष असून त्यांचे बंधू पृथ्वीराज देशमुख भाजपकडून आमदार आहेत.

देशमुख हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असून विधानसभा निवडणुकीत ते पलूस-कडेगाव मतदार संघातून इच्छुक होते. मात्र ती जागा शिवसेनेला गेल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली होती.

मराठा कार्ड काढत भाजपने महाविकास आघाडीला पहिला धक्का दिला आहे. राष्ट्रवादीच्या वतीने अरुण लाड यांची उमेदवारीची शक्यता आहे. यामुळे पदवीधरची लढत सांगली जिल्ह्यातील दोन उमेदवारात  होण्याची चिन्हे आहेत.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने आपली यादी जाहीर केली आहे. औरंगाबाद पदवीधर मतदार संघातू शिरीष बोरालकर, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख, नागपूर विभागातून  संदिप जोशी आणि अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातून नितीन धांडे यांची नांवे काही वेळापूर्वीच जाहीर झाली आहेत. गुरुवार 12 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

माजी सहकार मंत्री, आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख हेही पुणे पदवीधर मतदार संघासाठी इच्छुक होते. त्यांनी उमेदवारी मिळेल या आशेने जोरदार तयारी केली होती. लोकमंगलमधील सर्वच विभागांना मतदार नोंदणीसह इतर जबाबदारी देण्यात आली होती.