उत्साहात पार पडली सीड बॉल बनवण्याची कार्यशाळा

उत्साहात पार पडली सीड बॉल बनवण्याची कार्यशाळा

Seed Ball Workshop Eco Friendly Club

सोलापूर : लहान मुले, पालक, महाविद्यालयीन तरुणाई आणि ज्येष्ठ नागरिकांनी सीड बॉल बनविण्याच्या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदविला. जागतिक वसुंधरा दिनानिमित्त माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सोलापूर महानगरपालिका पर्यावरण विभाग, इको फ्रेंडली क्लब आणि सामाजिक वनीकरण विभाग, सोलापूर यांच्यावतीने भैय्या चौकातील डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक येथे सीड बॉल (बीज गोळे) बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली होती.

माती आणि शेण समप्रमाणात घेऊन एकजिव करण्यात आले. त्यात देशी झाडांच्या बिया घालून बॉलसारखे गोळे तयार करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी संजय भोईटे, पर्यावरण अभ्यासक मुकुंद शेटे यांनी सीड बॉल बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.

वाळलेले सीड बॉल सायकलिंग, निसर्ग भ्रमंती, ट्रेकींग आणि सहलीदरम्यान टाकण्यात येणार आहेत. हे सीड बॉल फुटून बियांना अंकुर येईल आणि त्या रोपांचे झाडात रुपांतर होईल, अशी ही संकल्पना असल्याचे वसुंधरा मित्र, इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे यांनी सांगितले.

दोन तासात शेकडो सीड बॉल बनवण्यात आले. सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, एमआयटीचे प्राचार्य स्वप्निल शेठ, निवृत्त पोलीस अधिकारी रमेश मोहिते यांनी कार्यशाळेला भेट देवून पर्यावरणप्रेमींना प्रोत्साहन दिले.

या कार्यशाळेत सोलापूर महानगरपालिकेचे पर्यावरण अधिकारी स्वप्निल सोलनकर, उद्यान अधीक्षक निशिकांत कांबळे, सहाय्यक उद्यान अधीक्षक अजय चव्हाण, संगमेश्वर महाविद्यालयाचे प्रा. शिवाजी मस्के, इको फ्रेंडली क्लबचे समन्वयक अजित कोकणे, प्रचेत बागेवाडीकर, पर्यावरणप्रेमी राजकुमार कोळी, राहुल वंजारी, सोलापूर रेल्वे विभागातील जकराया डवले, भारतीय डाक विभागातील श्रीरंग रेगोटी, एमआयटीच्या वंदना कोपकर, बाहुबली शहा, आनंद कोळी, महादेवी कोळी, तृप्ती पुजारी- चराटे, ज्येष्ठ पत्रकार विनायक होटकर, वैद्य प्रवीण बिरगे, सोनाली डवले, संतोष तडवळ, मयुरी जोशी, शर्वरी इंगळे, प्रियांका इंगळे, आदित्य शिंदे, सार्थक आसबे, यांच्यासह विविध क्षेत्रातील निसर्गप्रेमी उपस्थित होते.