पालकमंत्री विश्वासात घेत नसल्याने मिळाले संपर्कमंत्री

पालकमंत्री विश्वासात घेत नसल्याने मिळाले संपर्कमंत्री

कोण आहेत शंकरराव गडाख? वाचा...

सोलापूर : राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे सोलापूर जिल्हा शिवसेनेचे संपर्कमंत्रीपद देण्यात आले आहे. गडाख त्यांच्याकडे सोलापूरसह सांगली जिल्ह्याचीही जबाबदारी असणार आहे.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे हे शिवसेनेच्या नेत्यांना विश्वासात घेत नसल्याची तक्रार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी केली होती. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हाप्रमुखांसोबत संवाद साधला होता. ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे मंत्री पालकमंत्री म्हणून आहेत त्या ठिकाणी शिवसेनेकडून संपर्कमंत्री देण्यात आले आहेत.


अपक्ष आमदार आणि राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दोन महिन्यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे हातात शिवबंधन बांधून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघातून शंकरराव गडाख हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. 

अपक्ष आमदार असतानाही शिवसेनेने शंकरराव गडाख यांना राज्याच्या मंत्री मंडळात संधी दिली. त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी पुढाकार घेतला होता. ज्येष्ठ नेते अनिल राठोड यांच्या निधनानंतर अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेत पोकळी निर्माण झाली होती. गडाख यांना शिवसेनेत प्रवेश दिल्याने ताकद वाढणार आहे. 

माजी खासदार, ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव असेलेले शंकरराव गडाख यांना मानणारा मोठा वर्ग नेवासा मतदार संघात आहे. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री तसेच पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे शिवसेनेला विश्वासात घेत नाहीत. याची तक्रार पक्षप्रमुखांकडे केली होती. त्याची दखल घेऊन सोलापूरसाठी शंकरराव गडाख यांची संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापुढे आम्ही जिल्ह्यातील सर्व प्रश्न गडाख यांच्या माध्यमातून मांडणार आहोत. 
- पुरुषोत्तम बरडे, 
शिवसेना जिल्हाप्रमुख