बेडरूममध्ये घुसला नाग! वाचा पुढे काय झाले..

बेडरूममध्ये घुसला नाग! वाचा पुढे काय झाले..

Snake enters the bedroom 

सोलापूर  : नाग हे नाव ऐकताच भल्या भल्यांची झोप उडते.पण एखादा मोठा नाग मध्यरात्री तेही आपल्या बेडरूममध्ये निघाला तर काय होईल याचा विचार न केलेलाच बरा.. पण अशीच एक घटना रात्री एक वाजता नाथ रेसिडेन्सी येथे घडली.

अरविंद कोळेकर हे सोलापूर विद्यापीठात स्टेनोग्राफर असून रूपाभवानी मंदिराजवळील नाथ रेसिडेन्सीमध्ये राहतात. त्या दिवशी अरविंद कोळेकर यांनी रात्री दीड वाजता काहीतरी बेडरूममध्ये जात असल्याचे पाहिले. सुदैवाने त्या दिवशी त्या बेडरूम मध्ये कोणीच झोपले नव्हते.बेडरूमचा दरवाजा उघडा होता आणि आतील लाईटही बंद होती. कोळेकर हे बेडरूमच्या दाराजवळ गेले असता मोठा फुत्कारा त्यांना ऐकू आला. अधिक पाहणी केली असता एक मोठा साप बेडरूममधील कपाटाजवळ गेल्याचे त्यांना दिसले. त्यांनी ताबडतोब बेडरूमचे दार लावून नागास बेडरूम मध्ये कैद केले. लागलीच कोळेकर यांनी नॅचरल ब्लु कोब्रा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक इंगळे यांना फोन करून घरातील बेडरूम मध्ये एक मोठा नाग शिरल्याचे सांगितले. पण दीपक इंगळे हे दुसर्‍या गावी असल्याने त्यांनी जवळच राहणारे सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांना घटनास्थळी पोहचून त्या सापास पकडण्याची विनंती केली. इंगळे यांच्या विनंतीला मान देत सर्प अभ्यासक राहुल शिंदे एकटेच मध्यरात्रीचे दीड वाजले असतानाही घटनास्थळी पोहोचले.

अधिक पाहणी केली असता एक 4.5 फूट लांबीचा मोठा नाग फणा काढून बसल्याचे त्यांना दिसले. काही वेळातच या नागास अतिशय शिताफीने व नियोजनबद्ध पद्धतीने सावधपणे पकडण्यात आले. जीव मुठीत धरून बसलेल्या कोळेकर कुटुंबीयांनी यावेळी सुटकेचा निःश्वास सोडला. साप निघाल्यापासून ते साप पकडेपर्यंत श्री इंगळे हे झोप त्यागून सर्व घटनेचा फोनद्वारे आढावा घेत होते. नशीब बलवत्तर म्हणून या नागापासून कोळेकर कुटुंबियांना कसलाही धोका झाला नाही. श्री कोळेकर राहत असलेल्या घराच्या मागील बाजूस झाडी झुडुपी आणि गवत प्रमाणाबाहेर वाढले असून हा नाग तेथूनच आला असावा असे सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांनी सांगितले.

सद्ध्या पावसाचे प्रमाण वाढले असून अश्या वेळी सापांच्या बिळामध्ये पाणी शिरल्याने ते जास्तवेळ पाण्याने भरलेल्या बिळामध्ये तग धरू शकत नाहीत आणि बिळातून बाहेर पडुन कोरड्या जागेच्या शोधात काही वेळेस आपल्या घरामध्ये प्रवेश करतात.आपल्या घराजवळ पावसाचे पाणी साचल्याने कीटक त्यावर बसतात आणि त्यांना खाण्याकरिता बेडूक सारखे प्राणी तेथे येतात आणि सापांचे आयते भक्ष बनतात. बर्‍याच वेळेस खाल्लेले भक्ष पचविण्यासाठी साप आपल्या घराजवळ असलेल्या अडचणींमध्ये येऊन लपतात असे सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांनी सांगितले. साप घरात येऊ नये म्हणून काय उपाययोजना कराव्यात याची माहितीही यावेळी देण्यात आली. सर्पमित्रांनी मध्यरात्रीच्या वेळी दाखवलेली तत्परता कोळेकर कुटुंबियांचा जीव वाचवण्यास महत्वाची ठरली असून निसर्ग संवर्धना सोबतच लोकांचा जीव वाचवणे हे अतिशय अनमोल असे कार्य सर्पमित्र समाजासाठी करत असल्याचे श्री अरविंद कोळेकर यांनी सांगितले. या नागास त्वरित निसर्गमुक्त करण्यात आले.