का करतात साप द्वंद्व युद्ध? वाचा बातमी...

का करतात साप द्वंद्व युद्ध? वाचा बातमी...

सोलापूर - बाळे केगाव परिसरात एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे धामण नरांचे द्वंद्व युद्ध पहावयास मिळाले.

कोरोनो विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या संपूर्ण देश लॉकडाउन आहे. आता काही अंशी प्रमाणात अनलॉकची सुरू झालेली आहे. या लॉकडाउनमुळे पर्यावरणात एक चैतन्य निर्माण झाले आहे. त्याचे कारण म्हणजे काही काळासाठी तरी प्रदूषण मुक्त झालेले आहे.  सध्या जूनमध्ये चांगल्या पडलेल्या पावसामुळे निसर्ग हिरवाईने फुलून निघाला आहे. 

सध्या बऱ्याच सापांच्या प्रजननाचा काळ चालू आहे.  मागच्या दोन दिवसाखाली घोणस मादी सापाच्या चार पिल्लाची रेस्क्यू बाळे येथे एकाच ठिकाणी करण्यात आले आहे. 

मार्च ते जुलैच्या दरम्यान धामण सापांच्या मिलनाचा काळ चालू असतो. परंतु त्यासाठी मादीला आकर्षीत करण्यासाठी दोन तर काहीवेळेस तीन नरांना आपापसात द्वंद्व युद्ध करावे लागते. या द्वंद्व युद्धात एकमेकाला  चावा न घेता फक्त आपल्या ताकदीने फक्त खाली पाडण्याचा प्रयत्न करतात. या युद्धामध्ये जो नर धामण जिंकेल तो त्या परिसरातील मादीबरोबर मिलन करून पुढची प्रजावळ वाढवतो. मादी धामण एका वेळेस ६ ते १४ अंडी घालून दूर निघून जाते.  साधारण दोन महिन्यानंतर अंडीतून पिल्लं जन्माला येतात.

बाळे येथे जुना बार्शी नाका परिसरातील अरतानी गोडावूनच्या समोर  सकाळी ११:०० च्या दरम्यान तीन नरामध्ये द्वंद्व युद्ध चालू होते. गोडवूनच्या कामगारांनी आपापल्या मोबाईल मध्ये हे सुंदर दृश्य टिपून घेतले. संतोष धाकपाडे यांनी तिथल्या कामगारांना सांगितले "हे साप आपल्याला कोणतेही इजा पोहचवीत नाही" हे ऐकल्यावर त्या सापांना कुठलंही इजा पोहचवली नाही. साधारण साडेतीन तास हे युद्ध चालू होते. 

परत काहीवेळानंतर अंबिका नगर, बाळे येथे सुद्धा मनुष्यवस्तीत दोन नर धामण सापांचे द्वंद्व युद्ध चालू होते. तिथल्या नागरिकांमध्ये त्या दोन मोठ्या सापांना पाहून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु सुरेश क्षीरसागर यांनी अंबिका नगर येथे जाऊन तिथल्या नागरिकांना समजावून सांगितले. या सापांमुळे आपल्याला कुठलाच धोका नाही असे सांगून निघून आले. 

अजून काहीवेळाने सायंकाळी ६:०० च्या दरम्यान केगाव येथून कुणाल दळवी यांनी सोमानंद डोके यांना फोनवरून माहिती दिली की आमच्या शेतात दोन साप आहेत. काहीवेळातच  सोमानंद डोके तिथे पोहचले आणि पाहिलं असता कुणाल दळवी यांच्या शेतात देखील दोन धामण नराचे युद्ध चालू होते. डोके यांनी दळवी यांना सांगितले की या सापांपासून आपल्याला कुठलाही धोका नाही. हे साप शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे, डोके यांनी त्या सापांबद्दल सांगितल्यावर दळवी यांनी देखील ते साप आमच्या शेतातच राहू द्या असे ते बोलले. 

अशाप्रकारे सोमवारी एका दिवसात तीन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे धामण नरांचे द्वंद्व युद्ध पहावयास मिळाले.

‌धामण हा एक चपळ साप आहे. तो पाण्यात जलद पोहू शकतो. पोहताना त्याचे डोके पाण्याच्या बाहेर असते. झाडावर चढण्यातही हा साप तरबेज आहे. त्याच्या मार्गात असलेल्या वस्तूला तो शेपटीने वेटोळे घालतो. त्यामुळे भक्ष्य पकडण्यास त्याला आधार मिळतो. पाली, पक्षी व इतर लहान पृष्ठवंशीय प्राणी हे त्याचे अन्न आहे. तसेच बेडूक, कासवाची लहान पिले, वटवाघळे व लहान साप तो खातो. त्याचे मुख्य भक्ष्य उंदीर आहे. शेतातील उंदीर फस्त करून तो पिकांचे नुकसान टाळतो व अशा रीतीने तो शेतकऱ्याचा मित्र ठरतो. धामण आपले भक्ष्य पटकन गिळतो. प्रतिकार करू न शकणारे बेडकासारखे प्राणी तो जिवंतच गिळतो. नंतर तो आपल्या शरीराने जमिनीवर दाब देऊन पोटातील भक्ष्याला मारतो.

‌असे कुठेही सापांची मिलन अथवा द्वंद्व युद्ध चालू असेल तर त्यामध्ये कुठलीही बाधा आणू नये. बऱ्याच वेळा आम्हाला पहायवास मिळते की कुठल्यातरी सापांचे मिलन अथवा द्वंद्व युद्ध चालू असेल तर त्या सापांवर कापड टाकणे, अगरबत्ती लावून नारळ फोडणे हा प्रकार दिसतो.

ही सर्व अंधश्रद्धा आहे, असे नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे कार्याध्यक्ष भरत छेडा यांनी सांगितले. 

हे माहिती नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे सदस्य संतोष धाकपाडे यांनी संकलित केली आहे.