गिर्यारोहकांचा रद्दीपासून समृद्धीकडे उपक्रम!

गिर्यारोहकांचा रद्दीपासून समृद्धीकडे उपक्रम!

Social activities of mountaineers


सोलापूर : नवीन वर्ष आणि नाताळच्या निमित्ताने सगळेच जल्लोषात पार्टी आणि वेस्टर्नाईज कल्चरला जवळ करत सिक्रेट सॅंटाची वाट पाहत असतो. नुतन वर्षाचे निमित्त साधुन आपण खुप नव्या गोष्टी विकत घेतो.  नुतन‌ वर्षाच्या निमित्ताने सांगोला मधील गिर्यारोहक वैभव ऐवळे आणि त्यांच्या मित्रांनी यंदाच्या नवीन‌ वर्षाचे पहिले कोरे पान प्रबालमाची येथील आदिवासी पाड्यात एका वेगळ्या पद्धतीने साजरा केला.

ह्या सगळ्या गिर्यारोहकांनी आपल्या घरातुन आणि आजुबाजुच्या मित्र आणि ओळखीच्या लोकांकडून वापरत नसलेले कपडे, साड्या, नवीन वहृया, पट्टी-पेन्सिल-शार्पनर-रबर आणि सानवी समाजसेवी संस्थेने ब्लॅंकेट आणि कानटोप्या अश्या वस्तु गोळा केल्या तसेच गाव-पाड्यातील मुली-महिलांना मासिक पाळीच्या काळात लागणारे सॅनिटरी पॅड्स घेवुन ते १ जानेवारी २०२१ म्हणजे वर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळी पाड्यावर पोहोचले. लाॅकडाउनचे‌ सर्व नियम पाळत ह्या तरुणांनी ह्या सर्व गोष्टी पाड्यातील सर्वांना वाटल्या.

या आधीही या तरुण गिर्यारोहकांनी असे वेगवेगळे उपक्रम राबविले आहे त्यात दिवाळीनिमित्त फराळ वाटप, महिलादिन विशेष उपक्रम, तिचे चार दिवस- मासिक पाळी जनजागृती उपक्रम, लहान मुलांसाठी बालदिन विशेष एक दिवसीय ट्रेक असे उपक्रम त्यांनी केले आहे.

१ जानेवारी च्या उपक्रमाला त्यांनी *रद्दी पासुन समृध्दिकडे* असे नाव‌ दिले होते. मोहिमेत सोलापूर मधील वैभव ऐवळे - (सांगोला), बाळकृष्ण जाधव, अरुणकुमार शिंदे, श्रीपाद यादव, मुंबई मधील निलेश माने, गिरीधर नागपुरे, अजय माने, सानवी नायक, सत्येंद्र काटे, ईशा नायक, रोहन जाधव यांचा सहभाग होता.
पाड्यातील लोकांना मिळालेल्या ह्या भेटवस्तू मुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदाची वेगळी चमक होती.

या तरुणाईच्या मते साधारणतः शहरी आणि विकसित गावात ह्या सर्व गोष्टी आणि मासिक पाळीच्या दरम्यानच्या वेळेस घ्यावयाची काळजी ह्याची माहिती आणि गोष्टी सहज उपलब्ध आहेत, पण गडावर किंवा डोंगर-किल्ल्यावर जवळील दुर्लक्षित भागात शिक्षण आणि बाकी विषयांवर अजुनही तितके लक्ष दिले गेले नाही आहे, ह्या आदिवासी समाजाचे जनजीवन पर्यटकांवर अवलंबून आहे. गड चढताना जेवणाची किंवा राहण्याची सोय हीच लोक करतात सरळ शब्दात सांगायचे झाले तर आम्ही कोणताही गड-पर्वत तेथील रहिवाश्यांशिवाय सर करणे म्हणजे खुप कठीण आहे. मग त्यांच्यासाठी लागणारृया मुबलक गोष्टी त्यांना मिळवुन देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

आम्ही ठरविले आहे कोणताही किल्ला गड सर करताना आमच्याकडे लोकांनी दिलेल्या वस्तू किती का प्रमाणात असोत त्या घेवुन निघतो, आणि तेथील स्थानिक गरजु लोकांपर्यंत पोहचवतो. ह्या उपक्रमानंतर ह्या तरुणांनी कलावंती दुर्ग ह्या गडाची चढाई केली. रद्दी ते समृध्दी उपक्रमाला सहयाद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र तसेच सह्याद्री विद्यार्थी अकादमी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आणि बऱ्याच लोकांनी सहकार्य केले त्या सर्वांचे वैभव आणि त्यांचा टीम ने आभार मानले.