मंदिर उघडण्यासाठी भाजपचे घंटानाद; शिवसेनेने हिंदुत्व गुंडाळल्याचा आरोप

मंदिर उघडण्यासाठी भाजपचे घंटानाद; शिवसेनेने हिंदुत्व गुंडाळल्याचा आरोप

सोलापूर : तीन तिघाडा आणि काम बिघाडा अशी परिस्थिती महाआघाडी सरकार आल्यापासून राज्याची झाली आहे. एकीकडे दारू दुकाने, बिअरबार सुरू आहेत. यातून शासन कोट्यवधींची माया गोळा करत आहे मात्र दुसरीकडे देवाला भेटण्यासाठी जनता आतुर झाली असतानाही मंदिर बंद करण्याचे पाप या शासनाकडून सुरू आहे.या सरकारचा  पापाचा घडा भरला  असून आता जनता या सरकारला त्यांची जागा दाखवेल,  असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.

राज्यातील सर्व मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने महाराष्ट्रभर घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे, त्या पार्श्वभूमीवर आ. सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिर येथे  घंटानाद आंदोलन करण्यात आले, त्यावेळी आ. देशमुख बोलत होते. यावेळी  शहराध्यक्ष विक्रम देशमुख,  महापौर श्रीकांचना यन्नम, माजी महापौर शोभा बनशेट्टी उपस्थित होते.

कोरोना महामारीचे संकट संपूर्ण देशावर आले आहे. राज्यात फार भयानक परिस्थिती आहे. ही परिस्थिती हाताळण्यात महाआघाडीचे सरकार अपयशी ठरले आहे. सर्व बिअरबार, दारू दुकाने सुरू करून सरकार  वसुली करण्याच्या नादात आहे. त्यांना सामान्य जनतेची कोणतीही पर्वा नाही. सध्या भक्तगण देवाला भेटण्यासाठी आतुर झालेले आहेत मात्र त्यांना देवापासून लांब ठेवण्याचे पाप या सरकारकडून सुरू आहे. याचा निषेध म्हणून भाजपतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. हा घंटानाद ऐकून तरी या शासनाला मंदिर उघडण्याची बुद्धी येईल, असेही आ.  देशमुख म्हणाले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी उद्धवा धुंद तुझे सरकार अशी घोषणाबाजी केली.या आंदोलनात नगरसेविका राजश्री चव्हाण, बिज्जू प्रधाने, शशी थोरात, महेश देवकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थिती होती.

शिवसेनेने हिंदुत्व गुंडाळले
मंदिर अद्यापही बंद ठेवून शिवसेनेने हिंदुत्व गुंडाळून ठेवल्याचे सिद्ध होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर ते हिंदुत्व सोडूनच सरकारमध्ये गेले आहेत. त्यांना जनता निश्चितच धडा शिकवेल, अशी टीका आमदार देशमुख यांनी यावेळी केली.