खुन करुन पुरावा नष्ट केला;  पती आणि सासूला जन्मठेपेची शिक्षा

खुन करुन पुरावा नष्ट केला;  पती आणि सासूला जन्मठेपेची शिक्षा

सोलापूर : निर्घृणपणे खुन करुन पुरावा  नष्ट केल्याप्रकरणी रमजान शेखसह दोघांना जन्मठेप व प्रत्येकी 3000 दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली आहे. सोलापूरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर एन पांढरे यांनी आरोपी क्रं १ रमजान मन्नू शेख वय-22 वर्षे, आरोपी क्रं. २ अम्मा ऊर्फ रेणूका मन्नू शेख आरोपी क्रं. ३ शाहीन रहीमान शेख सर्व रा. घाडगे दुध डेअरी समोर, संजय नगर झोपडपटटी, अक्कलकोट यांना, शहनाज रमजान शेख वय 30 वर्षे रा. घाडगे दुध डेअरी समोर, संजय नगर झोपडपटटी, अक्कलकोट हिचा खुन केल्याप्रकरणी दोषी धरण्यात आले होते. तर आरोपी दिलदार तकदीरखाँ सौदागर वय 35 वर्षे रा. घाडगे दुध डेअरी समोर, संजय नगर झोपडपटटी, अक्कलकोट दोषी धरण्यात आले होते.

सदर प्रकरणात सविस्तर हकिकत अशी की, दिनांक ०२/०८/२०१८ रोजी रात्री ०८:३० वा. सुमारास आरोपी रमजान आणि आरोपी अम्मा शेख आणि रमजान याची मयत पत्नी सौ शहनाज आणि शेजारी राहणारी आरोपी शाहीन शेख यांनी घटनेच्या ०९ महिन्यापूर्वी अक्कलकोट येथील विकास हॉटेल जवळ शहनाज हिच्या ०५ महिन्यांच्या मुलीचा सर्व आरोपींनी खून करून टाकून दिले होते. त्या प्रकरणावरून सर्व  आरोपीमध्ये भांडणे सुरू झाली होती. त्यावेळी आरोपी रमजान आणि आरोपी अम्मा शेख व दुसरी आरोपी शाहीन शेख असे तिघांनी मिळून आरोपी नं ०१ रमजानची पत्नी शहनाज हीस लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याने ती जागीच बेशुध्द होवून पडली होती. त्यावेळी आरोपी रमजानची आई अम्मा शेख हिने शेजारी राहणारा आरोपी  दिलदार सौदागर याची रिक्षा भाडयाने आणली आणि त्या रिक्षामध्ये मयत शहनाज हिस बसवून तीला अक्कलकोट येथील सरकारी दवाखान्यासमोर अम्मा शेख व शाहीन शेख यांनी नेले. आरोपी रमजान त्यांच्या पाठोपाठ मोटार सायकलवर तेथे गेला. त्याठीकाणी सदर दवाखान्याच्या मोकळया जागेत मयत शहनाज हिस नेण्यात आले. आरोपी शाहीन शेख हिने मयत शहनाज हिचे दोन्ही पाय पकडले तर आरोपी अम्मा शेख हिने मयत शहनाज शेख हिचे दोन्ही हात पकडले आणि आरोपी रमजान याने एक्सा ब्लेडने तिची पत्नी मयत शहनाज हिचे मुंडके कापून धडावेगळे केले. सदरची घटना आरोपी दिलदार सौदागर याने पाहिली होती म्हणून त्यास जीवे मारण्याची धमकी सदर तिन्ही आरोपींनी दिली आणि एका पोत्यामध्ये मयत शहनाज हिचे प्रेत आणि मुंडके एकत्र भरून ते आरोपी दिलदार सौदागर याच्या रिक्षाने अक्कलकोट एम.एस.ई.बी. चौकात आणण्यात आले आणि तेथून सदरचे प्रेत आरोपी क्रं.१ रमजान शेख याने मोटार सायकल वर ठेवले व सदर प्रेताला आरोपी शाहीन शेख हिने धरले आणि सदरचे प्रेत आरोपी रमजान आणि शाहीन या दोघांनी मिळून रेल्वे अपघात दाखवण्यासाठी मौजे तोळणूर, ता. अक्कलककोट या गावाचे शिवारात असलेल्या रेल्वे रूळावर टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. सदर गोष्टींची प्रथम खबर रेल्वे गेटमन म्हाळप्पा ढोणे यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन मध्ये दिली असता पोलीसांनी सदर केसचा तपास करून सदर केसमध्ये सरकारपक्षाच्यावतीने पोलीस कॉन्स्टेबल धनसिंग राठोड यांनी पोलीस  स्टेशनला फिर्याद दिली असता पोलीसांनी आरोपींच्या विरुध्द भा.दं.वि.कलम 302, 201 सह कलम 34 प्रमाणे गुन्हा नोंदवून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर प्रकरणात सरकारपक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी न्यायालयात १७ साक्षीदार तपासले. सदर प्रकरणात वैदयकीय पुरावे , परिस्थितीजन्य पुरावा आरोपींनी दिलेला कबुली जबाब आणि‍ आरोपींनी दिलेले निवेदन पंचनामे या सर्व गोष्टींवरुन सदर सर्व आरोपींनी मिळून मयत शहनाज हिचा निर्घृणपणे खुन करुन पुरावा नष्ट करण्याचा  प्रयत्न केल्याचे व ते सिध्द केल्याचे युक्तीवादात सांगण्यात आले सदरचा युक्तीवाद ग्राहय धरुन आजरोजी यातील आरोपी रमजान शेख, अम्मा ऊर्फ रेणूका मन्नू शेख आणि आरोपी शाहीन रहीमान शेख यांना खुन करणे व खुनाचा पुरावा नष्ट करणे याबाबत दोषी धरण्यात आले होते, तर आरोपी दिलदार सौदागर याला खूनाचा पुरावा नष्ट केल्याचा आरोपाखाली दोषी धरण्यात आले होते.

सदर प्रकरणात आजरोजी मा. न्यायालयात आरोपींच्या शिक्षेवर सुनावणी होवून सदर आरोपींना खुनाच्या अपराधाखाली जन्मठेपेची सुनावली आहे. सदर कामी जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी केलेला युक्तीवाद मा. न्यायाधीश श्रीमती आर. एन. पांढरे साहेब यांनी ग्राहय धरुन खुन केल्याप्रकरणी आरोपी १) रमजान मन्नू शेख, २) त्याची आई अम्मा ऊर्फ रेणुका मन्नू शेख, ३) त्यांचे शेजारी राहणारी शाहीन रहमान शेख या तिघांना भा.दं.वि. कलम 302 सह कलम 34 अन्वये जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी रक्कम रु. 3000/- दंडाची शिक्षा सुनावली व दंड न भरल्यास दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच वरील सर्व आरोपींसह आरोपी क्रं. २ दिलदार सौदागर यास खुनाचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी भा.दं.वि. कलम 201 सह कलम 34 अन्वये पाच वर्षे कारावासाची शिक्षा व प्रत्येकी रक्कम रु. 1000/- दंडाची शिक्षा सुनावली व दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी काम पाहिले. तर आरोपी क्रं. 1 व ३ च्या वतीने ॲड. बडेखान, आरोपी क्रं. २ च्या वतीने ॲड. शशी कुलकर्णी तर आरोपी क्रं. ४ च्या वतीने ॲड. बायस यांनी काम पाहिले. सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक व्ही. एस. जाधव यांनी केला तर कोर्ट पैरवी म्हणून पो.कॉन्स्टेबल डी. वाय. कोळी यांनी काम पाहिले आहे.

ॲड. प्रदीपसिंग राजपूत, जिल्हा सरकारी वकील