काल केले डांबरीकरण अन् आज खोदला रस्ता!

काल केले डांबरीकरण अन् आज खोदला रस्ता!

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका प्रशासन असो किंवा मग स्मार्ट सिटी कंपनी असो कधीच कोणतेही काम करताना अपेक्षित नियोजन होताना दिसत नाही.

शहरात सगळीकडे रस्त्यांची वाट लागली असल्याचे दिसून येत आहे. अशातच नव्याने केलेले रस्तेही खोदून पुन्हा रस्ते खराब करण्याचा प्रताप होताना दिसत आहे.

जानकर नगर वाय चौक येथून आमराईकडे जाणाऱ्या रस्त्याचे कालच काम केले आहे. परंतु येथे बांधकाम सुरू असलेल्या बिल्डरकडून आज रस्ता खोदला आहे. येथे गेल्या वर्ष-दीड वर्षांपासून या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्याच वेळेस रस्ता खोदून जे आहे ते काम करणे गरजेचे होते. परंतु कालच रस्त्याचे काम झाले असताना आज खोदकामाचा प्रताप केल्याचे दिसत आहे.

सोलापुरातील पत्रकार रणजित वाघमारे यांनी या संदर्भातील माहिती आणि छायाचित्र शेअर केले आहे.

दरम्यान महानगरपालिकेच्या परवानगीनेच रस्ता खोदून ड्रेनेज जोडण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा रस्ता दुरुस्त केला जाईल, असे नगरसेवक गणेश वानकर यांनी सांगितले.