ग्रीन कॅम्पसबद्दल सोलापूर विद्यापीठास जागतिक स्तरावरील मानांकन जाहीर

ग्रीन कॅम्पसबद्दल सोलापूर विद्यापीठास जागतिक स्तरावरील मानांकन जाहीर

Solapur University announces world class rating for Green Campus

सोलापूर - इंडोनेशिया विद्यापीठाच्या पुढाकारातून दरवर्षी जाहीर होणाऱ्या जागतिक स्तरावरील शाश्वत पर्यावरणपूरक ग्रीन कॅम्पसबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास मानांकन जाहीर झाले आहे. या मानांकनामुळे जागतिक स्तरावर सोलापूरचे नाव झाल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी म्हटले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कॅम्पस हिरवाईने नटले आहे. हजारो वृक्ष-वेलींनी हा सुंदर परिसर बहरलेला आहे. विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांबरोबरच येणाऱ्या प्रत्येकास येथील परिसर आनंद देतो. निसर्गसमृद्धतेने संपन्न झालेल्या येथील ग्रीन कॅम्पसची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली आहे. इंडोनेशिया विद्यापीठाकडून या मानांकनाचे प्रमाणपत्र पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास प्राप्त झाले आहे.

ग्रीन मेट्रिक वर्ल्ड युनिव्हर्सिटी- 2020 रँकिंगचे मानांकन मिळाले आहे. शाश्वत पर्यावरणपूरक ग्रीन कॅम्पसमध्ये देशात 22 वा, देशात पर्यावरण शिक्षणात 12 वा क्रमांक तर जगात 488 वा क्रमांक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा आहे. ऊर्जा आणि हवामान बदल यात 484 वा क्रमांक आहे. पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि हवामान बदल, कचरा, पाणी, परिवहन, शिक्षण आदी मुद्दे यामध्ये विचारात घेण्यात आली आहेत. यासाठी विद्यापीठाकडून इंडोनेशिया विद्यापीठास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, प्रभारी कुलसचिव डॉ. विकास घुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण विभागाचे प्रमुख डॉ. विनायक धुळप यांनी यासाठी प्रस्ताव सादर केला होता.