विमानसेवेचा विषय हलक्यात घेऊ नका; आंदोलनावेळी इशारा

विमानसेवेचा विषय हलक्यात  घेऊ नका; आंदोलनावेळी इशारा

Solapur Viman Seva Andolan News

सोलापूर : केंद्र सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्पां पैकी एक उडान योजने अंतर्गत सोलापूरच्या सर्व सोयींनीयुक्त असलेल्या होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी आज सोलापूरकरांनी आक्रमक भूमिका घेत एक दिवसीय आंदोलनाचे शस्त्र हाती घेतले.

नागरी विमानसेवा नसल्याने सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्याचे गेल्या अनेक वर्षांपासून अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे व येथील लाखो तरुणांना आणि उद्योजकांना नाईलाजास्तव कायमस्वरूपी सोलापूर सोडून जाण्यास भाग पडले, ज्याचा सोलापूरच्या भौतिक, आर्थिक आणि सामाजिक विकासात विपरीत परिणाम झाला.

Video -

सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी सोलापूरच्या विमानसेवे संदर्भात कोणतीही अभ्यासपूर्ण आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याची कृती न केल्यामुळे सोलापूरचा विमानसेवेचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण केला आणि ह्याच कारणांस्तव येणाऱ्या सर्व निवडणुकीत सर्व प्रस्थापित नेत्यांना त्यांची राजकीय किंमत चुकवावी लागेल असा इशारा आंदोलनस्थळी उपस्थित मान्यवरांच्या वतीने देण्यात आला. टेक्सटाईल, गारमेंट, यंत्रमाग, केमिकल, मेडिकल, हॉस्पिटल, म्युनुफॅक्टरींग, आय.टी.इंडस्ट्री, शाळा, महाविद्यालय आणि धार्मिक तिर्थक्षेत्र ह्या सर्व उद्योगांना आज विमानसेवा ही मुलभुत गरजेची झाली असून ती ह्या शहरात नसल्याने सोलापूरकरांचे न भरुन निघेल इतके नुकसान झाले आहे. होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी सोलापूर विकास मंचासहित सोलापूरच्या इतर सामाजिक संस्था, संघटना आणि व्यक्ती यांनी भारताचे पंतप्रधान, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाला वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून तथा इमेलच्या माध्यमातून निवेदनाद्वारे विनंती केल्या आहेत, ज्याची आजतागायत सकारात्मक अमलबजावणी न झाल्यामुळेच सोलापूरकरांनी आंदोलनाचे हत्यार हाती घेतले. 

०९ ऑगस्ट २०२२ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित सोलापूर दौरा निश्चित असून त्यांच्या दौर्‍या आधी होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवेस प्रमुख अडथळा असलेले सर्व अनाधिकृत बेकायदेशीर अडथळे तात्काळ दुर करुन नागरी विमानसेवा सुरू करण्या संदर्भात जिल्हाधिकारी यांना सोलापूरकरांच्या वतीने सोलापूर विकास मंचच्या वतीने निवेदन सुपूर्द करण्यात आले. सोलापूर विकास मंचच्या वतीने आयोजित एक दिवसीय धरणे आंदोलन घेण्या विषयी मिलिंद भोसले यांनी महत्त्व विशद केले, होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवे संदर्भात आज पर्यंतच्या संघर्षांची संपूर्ण माहिती केतन शहा यांनी सांगितली, आंदोलनाचे सूत्रसंचालन विजय कुंदन जाधव यांनी केले तर आंदोलनात सहभागी उपस्थितांचे आभार योगीन गुर्जर यांनी मानले. 

आंदोलन यशस्वी करण्यासाठी आनंद पाटील, अॅड. प्रमोद शहा, प्रतिक खंडागळे, अनंत कुलकर्णी आदी यांनी परिश्रम घेतले. आंदोलनात सोलापूरातील नामांकित संस्था, संघटना आणि व्यक्ती हे स्वयंस्फूर्तीने बहुसंख्येने उपस्थित होते.