शोधला तर देवही सापडतो, ‘यांच्या’ रूपात!

शोधला तर देवही सापडतो, ‘यांच्या’ रूपात!
Ashish and Rani sirsat

प्रत्येक माणसात "देव" शोधता येतो.. त्यासाठी स्वतःच्या अंगी देवपण असावे लागते. अशी माणसेच विरळ.. निस्पृह, निस्वार्थी, निर्भिड आणि मायाळू..

इथं हल्ली लॉकडाऊनच्या काळात स्वतःचा लेक त्याच्या वृद्ध आई-वडलांना नीट बघत नाही ना  अंत्यसंस्काराला येत नाही.. अशा कित्येक आई-वडिलांना प्रेमाची भाकर, मायेचा आधार देऊन त्यांना जिवंत ठेवणारा विरळच..
कित्येक अडकलेल्या, दमलेल्या, मानसिक खचलेल्या, भुकेलेल्या मजुरांना अन्नपाणी देऊन त्यांच्या इच्छित स्थळी (गावी) त्यांच्या मायलेकरांकडे पोचवणे..
हे काम एका देवदूताने पेक्षा कमी नव्हे.

असाच एक माणसातील देव शोधणारा "देवदूत".. "आतिश कविता लक्ष्मण सिरसट"..

ज्याने असंख्य जीवांना मायेचा ओलावा दिला, कित्येक नाती जोडलीत..
मनोयात्रींना पुन्हा माणसात आणले त्यांच्या हक्काच्या घरी त्यांना पोहोचवून पुनर्जन्म दिला..
आणि "रमजाना" सारख्या असंख्य बहिणींचा आशीर्वाद मिळवला..

या मनोयात्रींना तासंतास बोलून, त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याशी नातं जोडणं, त्यांची वैयक्तिक स्वच्छता करणं हे वाटतं तितकं सोपं नव्हेच..
हे सगळं करून त्यांना पुनर्जन्म देणं याहून मोठं पुण्य पाहिलं नाही..
निश्चित हे काम एकट्याचं नव्हेच..

या दिव्यात त्यांच्या सहचारिणीची साथ आहे.
कारण या लेकरांची काळजी घ्यायला एकाला बाप बनावे लागते तर दुसऱ्याला आई..
मुळात या माऊलीचा व्यवसायच मायेचा..
त्या "नर्स" आहेत. मध्यंतरी नर्सच्या भगिनींच्या सेवेबद्दलच्या माझ्या आर्टिकलमूळे आतिश शिरसट यांचा प्रत्यक्ष संपर्क आला.. त्यांच्या कार्यामुळे ते परिचित होतेच.

अन्न शिजवण्यापासून ते वाटपापर्यंत सलग 14 तास काम करणे आणि लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या भुकेलेल्यांना जगवणे हे काम करण्याचं बळ, इच्छाशक्ती यांचीच..

समाजाने तिरस्कारलेले तृतीयपंथी, ज्यांना आयुष्यभर परिवार नसतो.. त्यांच्यासाठी माय-बाप बनून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू वाटणे.. त्यांच्या डोळ्यातील अश्रूंचा आशीर्वाद मिळवणे हे कोणत्याही दैवी वरदानापेक्षा कमी नाही..

अत्यंत मागासलेल्या भागांची साफसफाई, निर्जंतुकीकरण करून त्यांना जीवनाची एक नवीन दिशा देणे. जगण्याचा आत्मविश्वास प्रत्येकांमध्ये  निर्माण करणे सध्या काळाची गरज आहे. हे आपल्या कृतीतून दाखवणे तितकेच आव्हानात्मक. हे कार्यही त्यांनी लीलया पार पाडले..

जेव्हा एका परगावच्या मजुरावर वेडे होण्याचा प्रसंग येतो.. काही उनाड मुलांनी त्याचे कपडे पळवलेले असतात.. तो नग्न होऊन रस्त्यावर सैरावैरा फिरतो, त्याला अन्न पाणीही कोणी देत नाही.. मनोरुग्ण होण्याच्या वाटेवर असताना देवरूपी माणूस भेटून त्याला अंगभर कपडे पुरवून, पोटभर खायला देऊन तेलंगणा मधील त्याच्या गावी जाण्याची व्यवस्था करून काही पैसे त्याच्या हातात टेकवतो..
ही कुठल्या चित्रपटाची कथा नसून प्रत्यक्ष घडलेल्या अनेक प्रसंगातील एक प्रसंग आहे..

असे कित्येक आशीर्वाद हे जोडपं कमवत आहे..
सलाम यांच्या जिद्दीला, कार्याला, सेवेला, मायेला.. 
शोधला तर "देवही" सापडतो.. यांच्या स्वरूपात..

- सुबोध रमेश सुतकर 
(जिल्हा सचिव, प्रहार शिक्षक संघटना, सोलापूर) 
मो. 9503221222