काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी धवलसिंह; आता शहराध्यक्ष पदाकडे लक्ष!

काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी धवलसिंह; आता शहराध्यक्ष पदाकडे लक्ष!

सोलापूर : सोलापूर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी धवलसिंह मोहिते-पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यातील विविध जिल्हाध्यक्षांच्या निवडी गुरुवारी सायंकाळी जाहीर करण्यात आल्या. काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी धवलसिंह मोहिते-पाटील हे शिवसेनेमध्ये होते. 

जिल्हाध्यक्ष बदलण्यात आल्याने आता सोलापूर शहराध्यक्ष देखील बदलण्यात येईल अशी चर्चा आहे. शहराध्यक्ष पदाची संधी कोणाला मिळणार या अनुषंगाने चर्चा सुरू आहे. विद्यमान शहराध्यक्ष प्रकाश वाले यांचे अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांशी जमत नसल्याचे दिसून येत आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांना सोबत घेऊन काम करणारा शहराध्यक्ष काँग्रेसला हवा आहे. काँग्रेस शहराध्यक्ष पदासाठी महापालिका गटनेते चेतन नरोटे यांचे नाव आघाडीवर आहे.

जिल्हाध्यक्षपदी धवलसिंह मोहिते-पाटील यांची निवड करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले. काँग्रेस कमिटीने जिल्हाध्यक्ष पदासह इतरही विविध पदांच्या निवडी गुरुवारी सायंकाळी जाहीर केल्या आहेत.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सरचिटणीसपदी माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष पदी रामहरी रुपनर यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सेक्रेटरीपदी माजी महापौर अलका राठोड, मनीष गडदे, किसन मेकाले गुरुजी, नरसिंह आसादे, पंडित सातपुते यांची निवड करण्यात आली आहे.