रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी औषध घेताय? थांबा, आधी 'हे' वाचा..

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी औषध घेताय? थांबा, आधी 'हे' वाचा..

नोंदणीकृत आयुर्वेद व युनानी तज्ञांकडूनच उपचार घेण्याचे 
महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनकडून आवाहन

सोलापूर : कोरोना व्याधीचा संसर्ग हा राज्यभर मोठ्या प्रमाणावर होत आहे. कोरोना व्याधीच्या उपचाराकरिता अद्याप कोणत्याही चिकित्सा पद्धतीमध्ये परिपूर्ण चिकित्सा पद्धती विकसित झालेली नाही, तथापि आयुर्वेद व युनानी चिकित्सा पद्धतीच्या सहाय्याने अनेक ठिकाणी तज्ञांद्वारे या व्याधीवर यशस्वी उपचार होत असल्याचे निदर्शनास येत आहे व या बाबतीत शासनाद्वारे विहित निती-नियमांचे पालन करुन विविध संशोधन प्रकल्प देखील सुरु आहेत. 

कोरोना व्याधीने ग्रस्त होऊ नये याकरिता संसर्गाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने रोगप्रतिकारक क्षमता वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. त्यादृष्टीने जनमानसामध्ये जागरुकता वाढली असून आयुष मंत्रालयाद्वारे सुचविण्यात आलेला आयुष काढा व अन्य औषधांच्या वापरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून त्या माध्यमातून रोगप्रतिकारक क्षमता वाढवून संसर्ग रोखण्याकरिता जनसामान्यांकडून आयुर्वेद व युनानी चिकित्सा पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. आयुष मंत्रालयाने सुचविलेल्या अधिकृत उपाययोजना व्यतिरिक्त काही गैरनोंदणीकृत व्यक्तींकडून मौखिक स्वरुपात व सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे दावे व आयुर्वेद, युनानी औषधांचा वापर कोरोना व्याधीच्या प्रतिबंध व उपचाराकरिता करण्यासंदर्भात दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत आहे. 

या माहितीच्या आधारे काही नागरिक परस्पर आयुर्वेद व युनानी औषधे यांचा वापर रोगप्रतिकारक्षमता वाढविण्याकरता व उपचाराकरिता तज्ञांच्या सल्ल्याशिवाय करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारचा तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेतलेल्या औषधांचा दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, यामुळे केवळ नोंदणीकृत आयुर्वेद व युनानी डॉक्टरांकडूनच उपचार घेणे आवश्यक आहेत. त्यादृष्टीने संचालक, आयुष संचालनालय, महाराष्ट्र शासन डॉ. कुलदीप राज कोहली यांच्यावतीने प्राप्त निर्देशानुसार कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनच्या माध्यमातून सर्वांना महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे. 

कोरोना किंवा अन्य व्याधींच्या प्रतिबंध अथवा उपचाराकरिता महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, मुंबईमधील नोंदणीकृत आयुर्वेद व युनानी तज्ञांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही औषध घेऊ नये असे आवाहन महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, मुंबईचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता, उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय पाटील, सदस्य डॉ. सचिन पांढरे, परिषदेचे सर्व सदस्य व परिषदेचे प्रबंधक डॉ दिलीप वांगे यांनी केले आहे.

काही नागरिक परस्पर आयुर्वेद व युनानी औषधे यांचा वापर रोगप्रतिकारक्षमता वाढविण्याकरता व उपचाराकरिता तज्ञांच्या सल्ल्याशिवाय करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारचा तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेतलेल्या औषधांचा दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- डॉ. सचिन पांढरे

डॉ. सचिन पांढरे