शहीद जवान सुनील काळे यांच्यावर गावात अंत्यसंस्कार

शहीद जवान सुनील काळे यांच्यावर गावात अंत्यसंस्कार

सोलापूर : शहीद जवान सुनिल काळे यांचे पार्थिव बार्शीत दाखल झाले असून मूळ गावी म्हणजेच पानगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दशहतवाद्यांविरोधात लढत असताना बार्शीच्या पानगावचे जवान सुनील काळे यांना वीरमरण आले आहे. सुनील जाधव यांनी आपला जीव धोक्यात घालून 2 दहशतवाद्याचा खात्मा केल्याची माहिती आहे.

ही बातमी कळताच पानगाव शोकाकूल झाला आहे. सुनील काळे लष्करी सेवेतून निवृत्त झाले होते. त्यांनी निवृत्ती न घेता सेवा वाढवून घेतली होती. त्यांच्या मागे दोन मुले, आई, पत्नी असा परिवार आहे.

सुनील यांना शेतीची मोठी आवड होती. ते नेहमी फोन करुन मित्रांची चौकशी करायचे. त्यांनी नवीन घर बाधले होते, अद्याप तिथे राहायलाही गेले नव्हते.

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील बांदझु येथे मध्यरात्रीनंतर लष्कर, केंद्रिय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त दलाची दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. केंद्रिय राखीव पोलिस दलातील हेडकाॅन्सटेबल सुनिल काळे (पानगाव ता. बार्शी) यांना हौतात्म्य प्राप्त झाले. अतिरेक्यांबरोबरची चकमक आणखी सुरुच आहे. सोमवारी रात्री पुलवामा येथील केंद्रिय राखीव पोलिस दलाच्या छावणीवर गोळीबार करुन ग्रेनेड फेकुन दहशतवादी फरार झाले आहेत. त्यांचा शोध घेताना ही चकमक घडली. सुरक्षा दलाच्या जवानांनी या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार मारलं. पुलवामामध्ये ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला तो संपूर्ण परिसर भारतीय सुरक्षा दलाकडून घेरण्यात आला असून अद्यापही शोध मोहीम सुरू आहे. अनेक दहशतवादी अजूनही या भागात लपून बसल्याची माहिती आहे.