काम समान आहे मग वेतनही समानच असायला हवे!

काम समान आहे मग वेतनही समानच असायला हवे!

आयुर्वेद विद्यार्थ्यांच्या मागण्या अद्याप प्रलंबित

सोलापूर : महाराष्ट्र राज्यातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन मासिक प्रत्येकी दहा हजार रूपयांनी वाढविल्याचा पार्श्वभूमीवर शासकीय अनुदानित आणि खाजगी आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर विद्यार्थी, आंतरवासियता प्रशिक्षणार्थी डॉक्टर तसेच आयुष वैद्यकीय अधिकारी यांनीही आपल्या काही मागण्या मांडल्या होत्या, त्या अद्यापही प्रलंबितच आहेत. 

        आयुर्वेद चिकीत्सक व विद्यार्थी यांचा 'समान काम, समान वेतन' हा अधिकार असतांना शासनाकडून त्यांना वारंवार सापत्न वागणूक देण्यात येते, त्यामुळे आयुर्वेद निवासी डॉक्टर, आंतरवासियता डॉक्टर आणि आयुष वैद्यकीय अधिकारी यांच्यात अजूनही तीव्र असंतोष आहे. शासकिय अनुदानित आयुर्वेद महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना 24 तास ड्यूटी करावी लागते. असे असतांना मासिक 2400 ते 2800 असे तुटपुंजे वेतन त्यांना 35 ते 40 वर्षांपासून देण्यात येते. त्यात भर म्हणजे त्यांना विनावेतन कोवीड ड्युटीही लावण्यात आली. विद्यापीठ परीक्षा जवळ आलेल्या असतांना देखील अद्यापही ते विनाविलगीकरण विश्रांती काळ सेवा देत आहेत. सेवा देत असतांना झालेल्या कोवीड बाधेमुळे काहीजण गैरहजर असल्याने त्यांचे त्या काळातील विद्यावेतन हे शासन धोरणाविरुद्ध असतांनाही कापण्यात आले. शासकीय व शासकीय अनुदानित आयुर्वेद महाविद्यालयातील आंतरवासियता डॉक्टर यांना मासिक केवळ 11,000 विद्यावेतन असताना त्यांचीही कोवीड ड्युटी लावण्यात आली. विद्यावेतनाच्या वितरणात देखील नेहमीच अनियमितता असते. खाजगी आयुर्वेद महाविद्यालयातील आंतरवासियता डॉक्टरांना एकही रुपया विद्यावेतन नसतांना त्यांनाही विनावेतन/विना मानधन कोवीड ड्युटी लावण्यात आली. दि. 26 मे 1981 च्या शासन निर्णयानुसार एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी आणि आयुष वैद्यकीय अधिकारी या दोघांचे समान काम आहे. त्यात आयुष वैद्यकीय अधिकारी सदैव अग्रेसर असतात. मात्र या दोघांच्या वेतनात 50 टक्क्यांपर्यंत तफावत आढळते. समान काम असतांना वेतनही समानच असायला हवे. 

        निमा स्टुडंट फोरम, सोलापूर जिल्हा शाखेतर्फे यापूर्वीही या विविध मागण्यांसंदर्भात शासनास वारंवार निवेदन देण्यात आले आहे, पाठपुरावा करण्यात आला आहे. पुन्हा एकदा या सर्व मागण्या शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी संघटनेतर्फे  निवेदन देण्यात आले आहे. या मागण्यांसंदर्भात शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन शासन अनुदानित व खाजगी आयुर्वेद महाविद्यालयातील निवासी डॉक्टर, शासकीय, शासन अनुदानित व खाजगी आयुर्वेद महाविद्यालयातील आंतरवासियता डॉक्टर तसेच आयुष वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्या ताबडतोब पूर्ण कराव्या, अशी अपेक्षा असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.