जागतिक क्षयरोग दिन  - 24 मार्च

जागतिक क्षयरोग दिन  - 24 मार्च

क्षयरोग (टीबी)

टी.बी. म्हटलं म्हणजे अजूनही काही जणांना भीती वाटत असेल. सुदैवाने आज क्षयरोग हा तेवढा भयंकर रोग राहिलेला नाही. मायकोबॅक्टेरीयम ट्यूबरक्युलॉसिस नावाच्या जंतुमुळे हा रोग होतो. हा रोग सामान्यत: फुफ्फुसांना होतो. शरीरातील लिंफग्रंथी, मेंदू, मणके, हाडे, त्वचा, आतडी, यकृत अशा इतर अवयवांनाही क्षयरोग होऊ शकतो.

भारतात दर हजार लोकसंख्येमागे क्षयाचे 4 ते 5 रोगी सांसर्गिक अर्थात रोगप्रसार करणारे असतात . क्षयरोग्याच्या बेडक्यात क्षयाचे जंतू असतात . थुकताना , खोकताना , बोलताना ते हवेत सोडले जातात . निरोगी व्यक्तीच्या श्वासाबरोबर हे जंतू फुप्फुसात प्रवेश करून त्या व्यक्तीला क्षयरोग होतो . शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीवरच हा रोग होणे वा न होणे अवलंबून असते . क्षयाच्या रुग्णात खोकला व बेडका , कधी कधी बेडक्यात रक्त पडणे , ताप येणे , वजन कमी होणे , भूक मंदावणे , दम लागणे , रात्री घाम येणे इ . लक्षणे दिसून येतात . बेडक्याच्या तपासणीद्वारे या रोगाचे खात्रीने निदान होऊ शकते . काही वेळा क्ष - किरण तपासणी व रक्ताची तपासणी करतात . क्षयरोगाचे निदान झाल्यानंतर तत्काळ उपचार सुरू केल्यास क्षयरोग सहा महिन्यात बरा होतो.

कधी कधी 9 ते 12 महिने उपचार घ्यावे लागतात . क्षयरोगाची आपल्या देशातील कारणे पाहिल्यास त्याचे मूळ आपल्याला दारिद्रय व पर्यावरणाच्या अस्वच्छतेत सापडेल . त्यामुळे जोपर्यंत देशाची आर्थिक व सामाजिक परिस्थिती सुधारणार नाही , तोपर्यंत क्षयरोगावर कायमस्वरूपी तोडगा निघणे अशक्यच आहे . क्षयरोगाच्या प्रतिबंधनासाठी लहान मुलांना बीसीजीची ( क्षयरोग प्रतिबंधक लस ) लस देणे.

पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ खोकला , बेडका , ताप असलेल्या रुग्णांच्या बेडक्याची तपासणी करून तत्काळ उपचार सुरू करणे , रुग्णाने खोकताना तोंडावर रुमाल ठेवणे , इतस्तत : बेडके न टाकणे हे उपाय करणे आवश्यक ठरते . एड्स झालेल्या 70 % व्यक्तींना क्षयरोगाची लक्षणे दिसतात . त्यामुळे एड्सच्या वाढत्या प्रसाराबरोबर क्षयरोगही वाढत जाण्याची शक्यता आहे . क्षयरोग प्रतिबंध व एड्स प्रतिबंधाचे उपाय यासाठीच एकत्रपणे राबवले गेले पाहिजे . दरवर्षी देशात साडेसहा लाख लोकांच्या मृत्युला कारणीभूत ठरणाऱ्या या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी व्यक्ती , समाज व देश अशा सर्वच पातळ्यांवर भरीव प्रयत्न होणे गरजेचे आहे.